मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून, त्याचा दमदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. ट्रेलरने या चित्रपटाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचवली असली तरी चित्रपटाची मध्यवर्ती कथा अद्याप गुप्तच ठेवण्यात आली आहे.
सोशल मीडियावर मात्र या चित्रपटातील पात्रांच्या लूकवरून आणि दृश्यांवरून हा चित्रपट वास्तव घटनांवर आधारित असावा, अशी चर्चा वेगाने पसरत आहे. विशेषतः आर. माधवनच्या भूमिकेचा लूक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या प्रतिमेशी मिळत असल्याने प्रेक्षकांत कुतूहल वाढलं आहे.
या चित्रपटात रणवीर सिंगसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रत्यक्ष जीवनातील कोणत्या व्यक्तींपासून ही पात्रं प्रेरित आहेत, याचा शोध नेटिझन्स मोठ्या उत्साहाने घेत आहेत.
रणवीर सिंग नेमक्या कोणाची भूमिका साकारत आहे?
ट्रेलरमध्ये रणवीर सिंगचा लूक अत्यंत वेगळा असून त्याच्या पात्राविषयी फारशी माहिती दिलेली नाही. तरीही, त्याच्या धडाडीच्या अॅक्शन सीन्स आणि वेशभूषा पाहता तो गुप्तहेराची किंवा पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या विशेष सैन्यदलाच्या जवानाची भूमिका साकारत असल्याचे मानले जात आहे. त्याचा लूक भारतीय शौर्यचिन्ह मेजर मोहित शर्मा यांच्याशी साम्य दाखवतो, असा अंदाजही वर्तवला जात आहे.
अर्जुन रामपालचे पात्र ‘मेजर इक्बाल’
ट्रेलरमध्ये अर्जुन रामपाल अत्यंत क्रूर आणि अत्याचारी ‘मेजर इक्बाल’च्या भूमिकेत दिसतो. एका भारतीय जवानासोबत अमानुष पद्धतीने छळ करतानाचे दृश्य ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
हे पात्र पाकिस्तानातील कुख्यात दहशतवादी इलियास काश्मिरी याच्यापासून प्रेरित असल्याची चर्चा आहे. काश्मिरीला “नवा ओसामा बिन लादेन” असेही संबोधले जात होते.
आर. माधवन – रॉ अधिकाऱ्याची झलक
आर. माधवनने या चित्रपटात रॉच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून त्याच्या पात्राचे नाव अजय सन्याल असे आहे. त्याचा लूक आणि बॉडी लँग्वेज पाहता हे पात्र राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर आधारित असल्याची प्रबळ चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
अक्षय खन्ना – रहमत डाकूच्या भूमिकेत
अक्षय खन्ना चित्रपटात रहमत डाकूच्या भूमिकेत झळकणार आहे. पाकिस्तानातील कराचीमध्ये सक्रिय असलेला आणि अंडरवर्ल्डमध्ये कुप्रसिद्ध ठरलेला सरदार अब्दुल रहमान बलुच याच्यावर हे पात्र आधारित असल्याचे बोलले जात आहे.
संजय दत्त – एसपी चौधरी अस्लम
संजय दत्तने या चित्रपटात बंदूक खांद्यावर टाकून सिगारेटचा स्वॅग जपत ‘एसपी चौधरी अस्लम’ची भूमिका साकारली आहे. त्याचे पात्र पाकिस्तानातील एका नामांकित आणि धडाडीच्या पोलीस अधिकाऱ्यापासून प्रेरित असल्याचा अंदाज आहे, ज्याने कराचीतील गुंडांना, विशेषतः रहमत डाकू आणि अर्शद पप्पू सारख्या गुन्हेगारांना गुडघ्यावर आणणाऱ्या मोहिमा राबवल्या होत्या.
धुरंधरच्या ट्रेलरने सर्व प्रमुख पात्रांची झलक दाखवली असली तरी कथानक नेमकं कोणत्या वास्तविक घटनांवर आधारित आहे, याबाबत अद्याप रहस्य कायम आहे.