मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा बालेकिल्ला असून या विधानसभेत भाजपाचे सहा नगरसेवक आहेत. या विधानसभेत भाजपा शतप्रतिशत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाची युती झाल्यास या विधानसभेत शिवसेनेला कुठेच शिरकाव करण्याची संधी नाही. या विधानसभेत युती नसल्यासच शिवसेनेला जागा मिळवता येतील. परंतु मुलुंडमधील विधानसभेत सहा प्रभागांमध्ये उबाठाच्या वाट्याला चार ते पाच जागा जाण्याची शक्यता असून मनसेला एका किंवा अधिक ताणल्यास दुसऱ्या जागेवर उमेदवार उभा करण्याची संधी मिळेल . मात्र, या सहाही प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना भाजपा युती असताना मुलुंड पश्चिमेला भाजपाची दावेदारी आणि मुलुंड पुर्वेचे प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला येत होते. पण सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युती तुटली आणि भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवताना मुलुूंडमधील सहाही प्रभागांमध्ये आपले उमेदावार उभे केले आणि सहाही उमेदवार निवडून आणले. भाजपाचे सहा नगरसेवक असल्याने या विधानसभेत युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा येणार नाही. तर याठिकाणी शत प्रतिशत भाजपाच दिसून येणार आहे.
प्रभाग क्रमांक १०३
हा प्रभाग आता महिला राखीव झाला असून मागील दोन निवडणुकांमध्ये तो सर्वसाधारण खुला प्रवर्गाकरता आरक्षित झाला होता. त्याआधी तो महिला आरक्षित होता. या मतदार संघातून भाजपाचे मनोज कोटक दोन वेळा निवडून आले होते. पण हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने याठिकाणी भाजपा महिला पदाधिकारी हेतल जोबनपुत्रा यांचे नाव चर्चेत आहे. तर या प्रभागावर उबाठाचा दावा असल्याने माजी नगरसेविका हेमलता सुकाळे यांचे नाव चर्चेत आहे. तर काँग्रेसच्यावतीने माजी महापौर आर आर सिंह यांच्या कुटुंबातून त्यांची सून निवडणूक रिंगणात उतरण्याचीही शक्यता आहे.
प्रभाग १०४
हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला आहे. या प्रभाग मागील दोन निवडणूक ओबीसीकरता राखीव झाला असून सन २००७ नंतर प्रथमच हा प्रभाग खुला झाला आहे. या मतदार संघातून भाजपाचे प्रकाश गंगाधरे हे निवडून येत आहेत. यंदाही त्यांची पक्की दावेदारी असली तरी किरीट सोमय्यांच्या मुलाचा प्रभाग ओबीसी महिला झाल्याने निलसाठी हा प्रभाग मोकळा करून तर दिला जाणार नाही ना असा स्थानिकांना प्रश्न पडला आहे. या प्रभागात उबाठाची प्रबळ दावेदारी असून त्यांच्याकडून सिताराम खांडेकर, शैलेश पवार यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसच्यावतीने माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे पुत्र अमित किंवा अन्य सदस्य निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.
प्रभाग क्रमांक १०५
या प्रभागातून भाजपाच्या रजनी केणी निवडून आल्या होत्या, परंतु काही महिन्यांपूर्वीच त्यांचे देहावसान झाले. पण हा प्रभाग आता ओबीसी महिला करता राखीव झाला आहे. सन २०१२ वगळता हा प्रभाग महिला राखीव झालेला आहे. सन २०१२मध्ये हा प्रभाग ओबीसी करता राखीव झाला होता. या प्रभागातून भाजपाच्यावतीने दिपिका घाग आणि नम्रता वैती यांच्या नावाची चर्चा आहे, हा प्रभाग उबाठालाच जाणार असून याठिकाणी त्यांच्याकडून ज्योती वैती, रसिका तोंडवळकर यांच्या नावाची चर्चा आहे . या प्रभागात शिवसेनेची दावेदारी असली तरी भाजपाची परंपरागत जागा असल्याने सोडली जाणार नाही. मात्र, शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता पाठक यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे.
प्रभाग १०६
हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला आहे. हा प्रभाग सन २०१२ ओबीसी झाला होता. पण इतर प्रत्येक निवडणुकीत तो खुलाच झालेला आहे. या प्रभागातून मनसेचे सत्यवान दळवी यांचा प्रबळ दावेदारी असली तरी उबाठाकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. यात मनसेतून उबाठात आलेले सागर देवरे, खासदा संजयभाऊ पाटील यांचे अत्यंत विश्वासू अभिजित चव्हाण तसेच अमोल संसारे, अनिष शेडगे यांची नावे चर्चेत आहे. पण देवरे हे आदित्य आणि वरुण सरदेसाई यांचे अतिविश्वासू आणि मित्र असल्याने देवरे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर काँग्रेसच्यावतीने संजय घरत आणि कैलास पाटील यांची नावे चर्चेत आहे
प्रभाग १०७
हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला.यापूर्वी दोन निवडणुकीत हा प्रभाग महिला आरक्षित झाला. भाजपाच्या समिता कांबळे या प्रभागातून निवडून आल्या असून महापालिका शाळांमध्ये योगा वर्ग सुरु करण्याची मागणी केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. हा प्रभाग खुला झाल्याने याठिकाणांहून समिता कांबळे यांची पक्की दावेदारी असली तरी खुला प्रवर्ग झाल्याने निल सोमय्या आणि माजी खासदार मनोज कोटक यांचे भाऊ केतन कोटक यांच्याही नावाची चर्चा आहे. तर उबाठाच्यावतीने दिनेश जाधव हे इच्छुक आहेत. या प्रभागातून शिवसेनेचे जगदीश शेट्टी हे इच्छुक असले तरी युतीमध्ये हा प्रभाग भाजपाकडे राखला जाणार आहे. युती न झाल्यास शेट्टी हे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार ठरतील . तर काँग्रेसच्यावतीने अनु शेट्टी हे इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
प्रभाग १०८
या प्रभागातून भाजपाचे किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या हे निवडून आले आहे. पण प्रभाग आता ओबीसी महिला करता राखीव झाला. मागील चार निवडणुकीत सर्व प्रकारची अनुसूचित जाती आणि जमाती वगळता सर्व प्रकारची आरक्षण पडली आहेत. हा प्रभाग भाजपाचा असल्याने भाजपाकडून जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष दिपिका घाग यांचे नाव आघाडीवर आहे. तर उबाठाकडून शुभांगी केणी, नंदिनी सावंत यांची नावे चर्चेत आहेत.
लोकसभेतील मुलुंड विधानसभेतील मतदान
विद्यमान खासदार संजय पाटील : ५५,९७९
पराभूत उमेदवार मिहिर कोटेचा : १, १६, ४२१
विधानसभेतील मतदान
आमदार मिहिर कोटेचा : १, ३१,५४९
पराभूत उमेदवार काँग्रेसचे राकेश शेट्टी : ४१,५१७
विधानसभा क्षेत्रातील संभाव्य उमेदवार
प्रभाग क्रमांक १०३(महिला प्रवर्ग)
भाजपा : हेतल जोबनपुत्रा, उबाठा : हेमलता सुकाळे
प्रभाग क्रमांक १०४(सर्व साधारण खुला प्रवर्ग)
भाजपा : प्रकाश गंगाधरे, उबाठा : सिताराम खांडेकर, शैलेश पवार, काँग्रेस: उत्तम गीते, राष्ट्रवादी काँग्रेस : अमित सुरेश पाटील
प्रभाग क्रमांक १०५ (ओबीसी महिला प्रवर्ग)
भाजपा : नम्रता वैती, दिपिका घाग, उबाठा : ज्योती वैती, रसिका तोंडवळकर, शिवसेना : सुजाता पाठक, काँग्रेस: मालती पाटील
प्रभाग क्रमांक १०६(सर्वसाधारण खुला प्रवर्ग)
भाजपा :प्रभाकर शिंदे, उबाठा : सागर देवरे, अभिजित चव्हाण, अमोल संसारे, अनिष शेडगे, मनसे: सत्यवान दळवी, काँग्रेस : संजय घरत, कैलास पाटील
प्रभाग क्रमांक १०७ (सर्वसाधारण खुला प्रवर्ग)
भाजपा: समिता कांबळे, निल सोमय्या, केतन कोटक, उबाठा : दिनेश जाधव, काँग्रेस : अनु शेट्टी, अपक्ष : विरल शाह
प्रभाग क्रमांक १०८ (ओबीसी महिला प्रवर्ग)
भाजपा : दिपिका घाग, उबाठा : शुभांगी केणी, नंदिनी सावंत, मनसे: राजेंद्र देशमुख