मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ ब सर्वसाधारण महिलासाठी राखीव असून या जागेवर एका पुरुषाने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. आज छाननीतही हा अर्ज वैध झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. सध्या अर्जाची छाननी सुरू आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ ब सर्वसाधारण महिला राखीव जागा आहे. या जागेसाठी एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ६ महिला असून त्यात एका पुरुषाचा उमेदवार अर्ज दाखल झाल्याची बाब भाजपचे माजी शहराध्यक्ष व नगरपालिका प्रभारी यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे एका पुरुषाचा महिला राखीव जागेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी नेमके करत होते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसाधारण महिलेसाठी ही जागा आरक्षित असताना एका पुरुषाचा अर्ज दाखल करून घेणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यातच सर्व उमेदवारांची प्रभाग निहाय छाननी झाली आहे. मात्र, या छाननीमध्ये ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात न आल्याने नेमकी चूक कोणाची झाली? हा प्रश्न निर्माण झाला आहे.