भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी
आपल्या देदिप्यमान तेजाने आसमंतात अखंड झळकणाऱ्या सप्तर्षींपैकी एक ऋषी म्हणजे महर्षी भारद्वाज. आपल्या पुण्यभूमी भारतातल्या अलकनंदा आणि भागिरथीच्या पावन संगमावर, देवप्रयाग येथे महर्षी भारद्वाजांचा आश्रम होता. त्या आश्रमाच्या परिसरात धरित्रीवर उदात्त तत्त्वांचे बिजारोपण करणारे आणि आकाशाच्या हृदयात भरून जाणारे विलक्षण नादमधुर आणि ओजस्वी असे वेदमंत्रांच्या सामगायनाचे सूर प्रत्यही निनादत असत. महर्षी भारद्वाज हे बृहत्साम या सामगायन प्रकाराचे आचार्य होते. सामवेदात रुची असणारे, म्हणजेच वेदमंत्रांच्या शास्त्रशुद्ध व स्वरबद्ध गायनाची आवड असणारे शेकडो शिष्य भारद्वाजांच्या आश्रमात सामवेदाचे अध्ययन करीत असत.
ऋग्वेदातील सहाव्या मंडलाच्या मंत्राचे द्रष्टे महर्षी भारद्वाज आहेत. त्यांची एक काव्यमय ऋचा बघू या,
न अहं तन्तुं न वि जानामि ओतुं न यं वयन्ति समरे अतमानाः।
कस्य स्वित् पुत्रः इह वक्त्वानि परः वदाति अवरेण पित्रा।।ऋ.मं६सू९.२
या जीवनरूपी वस्त्रपटलाच्या सरळ धाग्यांना मी जाणत नाही, तसेच तिरक्या धाग्यांनाही मी जाणत नाही. या वस्त्रनिर्मितीच्या उद्योगात जो नवनवीन मनोहर रंगीत वस्त्रे विणीत असतो त्यालाही मी जाणत नाही. या पृथ्वीतलावर असा कोणता थोर पुत्र असेल, की जो आपल्या पित्याशी याबाबत चर्चा करून आपल्याला उपदेश करेल? अशा अर्थाची ही ऋचा आहे, यात जीवनरहस्य जाणून घेण्याची नुसतीच इच्छा नाही, तर तळमळ आहे. सद्गुरूच्या भेटीची आस आहे. आपल्या आयुष्याला दिवसरात्रींच्या धाग्यांनी विणणारा कोण असेल? त्यात सुखाचे सरळ धागे वा दुःखाचे तिरपे धागे केव्हा येतील, हे आपल्याला माहीत नसते. या वस्त्राच्या विणकऱ्याला जाणून जीवनाचे रहस्य उलगडून सांगणारा श्रेष्ठ गुरू आपल्याला केव्हा भेटेल? या भावार्थाची ही ऋचा, “एक धागा सुखाचा... या वस्त्राते विणते कोण...’’ या सुप्रसिद्ध गीताची आठवण करून देते. असे आत्मचिंतन करणाऱ्या महर्षी भारद्वाजांना सत्कर्मरूप यज्ञातील वैश्वानर ज्योतीत आत्मदर्शन झालेले दिसून येते.
ध्रुवं ज्योतिः निहितं दृशये कं मनः जविष्ठं पतयत्सु अन्तः ।
विश्वेदेवाः समनसः सकेताः एकं ख्रतुं अभि विदन्ति साधु ।।ऋ.मं.६सू९.५
स्थिर असूनही गतिशील, चलनवलनाला शक्ती देणारी अशी ही वैश्वानर ज्योती सर्व प्राणिमात्रांत आत्मसुखदर्शनास्तव स्थापन केलेली आहे. सर्व देवस्वरूप मानव एक मनाने, एक विचाराने या वैश्वानर ज्योतीची उपासना करीत असतात, असे महर्षी भारद्वाज म्हणतात.
अाध्यात्माप्रमाणे महर्षी भारद्वाज धनुर्वेद, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र यांचेही विशेषज्ञ होते. भौतिक विज्ञानातही त्यांची स्पृहणीय कामगिरी असून यंत्रसर्वस्व नावाच्या महान ग्रंथाचे ते निर्माते होते. अथर्ववेदातही त्यांचे २३ मंत्र आहेत. महर्षी अंगिरस हे भारद्वाजांचे पितामह होते. भारद्वाजांचे पिता बृहस्पती व माता ममता. कौरवपांडवांचे गुरू द्रोण हे भारद्वाजांचे पुत्र होत. भारद्वाजांनी इंद्राकडून व्याकरणशास्त्राचे अध्ययन केले व ते अनेक ऋषींना शिकवले. तसेच इंद्राकडून भारद्वाज आयुर्वेद शिकले आणि आयुर्वेद संहितेची रचना केली. त्यांनी महर्षी भृगूंकडून धर्मशास्त्राचा उपदेश घेतला व भारद्वाजस्मृती लिहिली.
महर्षी भारद्वाजांच्या बाबतीत एक गोष्ट तैत्तिरिय ब्राह्मग्रंथात अशी आहे की, त्यांनी संपूर्ण वेदाच्या अध्ययनाचा प्रयत्न केला. त्यांच्या अध्ययन तपस्येने इंद्र प्रसन्न झाला. त्याच्याकडून भारद्वाजांनी तीन वेळा १००, १०० वर्षांचे आयुष्य वेदाध्ययनासाठी मागून घेतले. पण अखेरीस इंद्राने त्यांना सांगितले की वेदरूपी तीन पहाडापुढे तुझे अध्ययन मुठ्ठीभरच्या वाळूइतके आहे. वेद अनंत आहेत तेव्हा तू अग्नीला जाणून घे. त्यामुळे सर्व ज्ञान तू स्वतःच होशील. तेव्हा भारद्वाजांनी इंद्राकडूनच अग्नीतत्त्वाला जाणून घेतले आणि ते ज्ञानाशी तादात्म्य पावले. आयुर्वेदनिपूण असल्याने भारद्वाज हे सर्वांपेक्षा दीर्घायू आहेत. त्यांनी देवतांकडून बृहत्साम प्राप्त केले. बृहत्साम म्हणजे ऋचांचे असे गायन की ज्याच्या तेजोमय आलापातून स्वर्गलोकीची, आदित्याची दिव्यता प्रतीत होते. ते मनात भरून उरते. गौतम, वामदेव, कश्यप आणि भारद्वाज या ऋषीश्रेष्ठांना प्रमुख सामगायक म्हणतात. भारद्वाज म्हणतात, अग्नी हा मर्त्य मानवातील अमर ज्योती आहे, अग्नी विश्वव्यापी आहे, कर्मप्रेरक आहे अग्नीच्या धारणेसाठी दृढ साहसशक्ती हवी. स्वतःतली ही शक्ती जाणून घ्या. कोणापुढेही लाचारीने झुकू नका. आपल्या विद्येने सर्वांचे पोषण व्हावे, असा अनमोल उपदेश महर्षी भारद्वाजांनी केला आहे.?
anuradha.klkrn@gmil.com