Tuesday, November 18, 2025

महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागात मागील १६ वर्षांपासून अधिकारी कार्यरत असून यातील काही अधिकाऱ्यांचे तसेच निवृत्त अधिकाऱ्यांचे विकासकांशी साटेलोटे आहे. त्यामुळे विकासकांशी हातमिळवणी करणाऱ्या तथा संबंधितांच्या विरोधात लोकशाही दिनाच्या कार्यक्रमांतच बीआयटी चाळीतील भाडेकरुंनी आयुक्तांकडे हल्लाबोल करत अशा मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी संबंधितांची चौकशी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनानिमित्त लोकांच्या तक्रारी तसेच समस्या जाणून घेतल्या जातात. या लोकशाही दिनाच्या निमित्त उपस्थित काही नागरिकांनी एकत्रपणे हल्लाबोल करत मालमत्ता विभागातील काही अधिकारी तसेच सेवा निवृत्त अधिकारी हे विकासकांशी हातमिळवणी करत आहेत, तसेच त्यांच्या इशाऱ्यानुसारच काम करत असल्याचा आरोप केला. या विभागांत मागील १६ वर्षांपासून काही अधिकारी त्याच विभागांत आहेत. ज्यांचे विकासकांशी संबंध असल्याने त्यांची चौकशी केली जावी अशी मागणी समस्त भाडेकरुंनी माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्यासमवेत आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. हे सर्व भाडेकरु बीआयटी चाळीतील असून या त्रस्त भाडेकरुंनी लोकशाही दिनाच्या निमित्त जनता दरबारमध्ये सहभागी मांडली आहे. त्यामुळे भाडेकरुंच्या तक्रारींची दखल घेत उपायुक्त (सुधार) यांना चौकशीचे आदेश दिल्याचे भाडेकरुंच्या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतचे चौकशीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment