मुंबई: राज्यात लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणूका महायुती आणि महाविकास आघाडीच्या या दोन मोठ्या आघाड्यांमध्ये लढल्या गेल्या. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही ठिकाणी उभे असलेले उमेदवार पाहता, महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याचे दृश्य दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नगर परिषदेसाठी मतदान होणार असून निवडणूक अर्ज भरण्याची काल शेवटची तारीख होती. या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवरून लक्षात येते की, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत महायुतीमधील भाजप आणि शिवसेना समोरासमोर आले आहेत. तर काही ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.
स्वतंत्र पक्षाची लढत करणार मित्रपक्षाची ताकद कमी
- बदलापूरमध्ये शिवसेना स्वतंत्र लढत असून भाजप आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये युती आहे. येथे महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) पक्षाकडून उमेदवार देण्यात आले आहेत.
- पालघर नगर परिषदेमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे तीनही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. तर महाविकास आघाडीतील उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेची एकत्र लढत आहेत.
- जव्हार नगर परिषदेत भाजप स्वतंत्र लढणार, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती दिसणार आहे.
- अलिबाग येथे महायुतीत भाजप, शिवसेना एकत्र असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीतील शेकाप आणि काँग्रेस एकत्र लढत असून शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शप) स्वतंत्र लढत आहेत.
- आघाडीमधून शेकाप आणि काँग्रेस हे मित्रपक्ष मुरुड जंजिरामध्ये सोबत असणार आहेत. उबाठा गट स्वतंत्र असणार आहे.
- रत्नागिरी जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. तर काही ठिकाणी बंडखोरीची दिसत आहे. कारण रत्नागिरी नगरपरिषदेसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांची महायुती झाली असली, तरी अजित पवारांच्या उमेदवाराने नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. रत्नागिरीमध्ये भाजपसाठी सहा जागा देण्यात आल्या आहेत.
- चिपळूण, खेड आणि राजापूरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती असून राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे.
- अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस वगळता इतर मित्रपक्ष एकत्र लढणार आहेत. येथे मनसेच्या १४ उमेदवारांनी उबाठा गटातून अर्ज भरल्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याचे स्पष्ट झाले आहेत.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण या तिन्ही नगर परिषदांमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.