Tuesday, November 18, 2025

नगरपरिषद निवडणुकीत ‘परिवारराज’; नेत्यांच्या बायका, मुली, वहिनींची रिंगणात एन्ट्री

नगरपरिषद निवडणुकीत ‘परिवारराज’; नेत्यांच्या बायका, मुली, वहिनींची रिंगणात एन्ट्री

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तळागाळातील कार्यकर्त्यांचे राजकीय स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा वर्षानुवर्षे केली जाते. मात्र प्रत्यक्षात उमेदवारीचा मोठा वाटा नेतेमंडळींच्या नातेवाईकांकडे जात असल्याने कार्यकर्त्यांच्या आशांवर पाणीच पडत असल्याचीच चर्चा वाढली आहे. आयुष्यभर पक्षनिष्ठा दाखवत, प्रचारासाठी जीव तोडून मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना शेवटी ‘कढीपत्ता’ समजले जात असल्याची नाराजीही व्यक्त होत आहे. त्यातच अनेक नगर परिषदांमध्ये नेते, आमदार, मंत्र्यांचे कुटुंबीय सरळ उमेदवारीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (चिखलदरा नगरपरिषद) चिखलदरा नगरपरिषदेतील निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी नगरसेवक पदासाठी पहिल्यांदाच अर्ज भरला आहे.

गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन ( जामनेर) जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी पुन्हा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. सलग तीन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्या चौथ्यांदा निवडणुकीत उतरल्या आहेत.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक (पुसद नगरपरिषद) पुसदमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. उमेदवारीसोबतच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री आकाश फुंडकर (खामगाव नगरपरिषद) खामगाव नगरपालिकेत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आपल्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. भाजपने येथे एकला चलोचा नारा दिला आहे.

माजी सभापती (वि.प.) रामराजे निंबाळकर (फलटण नगरपरिषद) फलटणमध्ये राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर धनुष्यबाण चिन्हावर नगराध्यक्षपदाची लढत लढणार आहेत. विशेष म्हणजे वडील राष्ट्रवादीत असताना मुलगा वेगळ्या पक्षावर उमेदवारी देत आहे.

मंत्री संजय सावकारे ( भुसावळ नगरपरिषद) भुसावळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात उतरल्या असून उमेदवारी अर्जाच्या दिवशी भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

शिवसेना आमदार किशोर पाटील (पाचोरा नगरपरिषद) पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील नगराध्यक्षपदासाठी लढत असून प्रचाराच्या सुरुवातीलाच त्यांनी शक्तीप्रदर्शन केले.

शिवसेना आमदार संजय गायकवाड (बुलढाणा नगरपरिषद) बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे.

भाजप आमदार मंगेश चव्हाण ( चाळीसगाव नगरपरिषद) चाळीसगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत असून त्या अधिकृत उमेदवार आहेत.

आमदार सत्यजित तांबे, (संगमनेर नगरपरिषद) संगमनेरमध्ये अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे नगराध्यक्षपदासाठी उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात स्थानिक आमदार अमोल खताळ यांच्या भावजई सुवर्णा खताळ मैदानात असल्याने ही लढत विशेष रंगतदार होणार आहे.

माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर (फलटण नगरपरिषद) फलटणमध्ये माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे भाऊ समशेरसिंह निंबाळकर यांनीही अर्ज दाखल केला.

भाजप नेते राजन पाटील (अनगर नगरपंचायत) अनगर नगरपंचायतीत भाजप नेते राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

आमदार शिवसेना चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर नगरपरिषद) मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलगी संजना अप्टिल यांनी अखेर उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >