चीनच्या मोठ्या शहरांमध्ये सध्या एक नवीन आणि वेगळा सोशल ट्रेंड खूप चर्चेत आहे. त्याचे नाव आहे 'मॅन मम'. या ट्रेंडमध्ये फिट आणि तरुण पुरुष महिलांना पैसे घेऊन मिठी देतात. ही मिठी फक्त काही वेळेसाठी असते आणि ती गैर-रोमँटिक असते. ही सेवा सुरक्षित आणि मर्यादित वेळेची असते. एका 'हग' सेशनसाठी २० ते ५० युआन (म्हणजे साधारणपणे २५० ते ६०० रूपये घेतले जातात. सोशल मीडियावर या ट्रेंडची खूप चर्चा आहे आणि दररोज शेकडो पोस्ट व्हायरल होत आहेत.
एका चिनी कॉलेज विद्यार्थिनीने सोशल मीडियावर लिहिले की, ती तणावामुळे खूप थकून गेली होती. त्यावेळी तिने एका मित्राला मिठी मारली आणि तिला खूप आराम वाटला. तिने आपला हा अनुभव ऑनलाइन शेअर केला आणि आश्चर्य म्हणजे तिच्या पोस्टवर १ लाखांहून अधिक कमेंट्स आल्या. लोकांनी लगेच 'हग थेरपी' बद्दल बोलणे सुरू केले. काही आठवड्यांतच ही कल्पना चॅट ग्रुप्समधून बाहेर पडून पैशांनी मिळणारी सेवा बनली आणि तिची लोकप्रियता वाढली.
५ मिनिटांची मिठी, खर्च ₹६००!
'मॅन मम' ला चॅट ॲप्सद्वारे बुक केले जाते. ५ मिनिटांच्या सेशनसाठी २० ते ५० युआन लागतात. या भेटी सहसा सार्वजनिक ठिकाणी होतात, जसे की पार्क, मेट्रो स्टेशन किंवा शॉपिंग मॉल. काही पुरुष तर '५ मिनिटांसाठी ५० युआन' असे बोर्ड घेऊन रस्त्यावर उभे राहिलेले दिसतात. यामुळे हे स्पष्ट होते की ही सेवा आता एका लहान-मोठ्या व्यवसायात बदलली आहे.
चीनमधील महिला सांगतात की, जास्त काम, थकवा, एकटेपणा आणि सततचा तणाव यामुळे त्या त्रस्त असतात. अशा वेळी काही मिनिटांची मिठी त्यांना हलके आणि तणावमुक्त वाटण्यास मदत करते. या अनुभवामुळेच या सेवेची मागणी वाढत आहे. एका महिलेने सांगितले की, तीन तास जास्त काम केल्यानंतर मिळालेली मिठी तिच्यासाठी तणाव अचानक कमी करणारी होती. हे सेशन पूर्णपणे भावनिक आणि सुरक्षित असल्याने महिलांचा यावर विश्वास बसला आहे.
तज्ञ काय सांगतात?
तज्ञांच्या मते, हा ट्रेंड चीनच्या तरुणांमधील वाढता एकटेपणा, नोकरीची अनिश्चितता, जास्त राहण्याचा खर्च आणि अभ्यासाचा तणाव यांसारख्या गंभीर समस्या दर्शवतो. ऑनलाइन जगात हजारो मित्र असूनही लोक वास्तविक जीवनात खूप एकटे पडले आहेत. त्यामुळेच 'मॅन मम' सारखे ट्रेंड येत आहेत.