मोहित सोमण: आज एसबीआयने (State Bank of India SBI) मोठी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बँकेच्या बाजार भांडवलात (Market Capitalisation) ९ ट्रिलियन रूपयांची पातळी पार केली आहे. त्यामुळे ९ ट्रिलियन पातळी पार केलेली ६ वी भारतीय संस्था (Organisation) ठरली आहे. आज कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी १२.१३ वाजेपर्यंत ०.५४% वाढ होत ९७४.१० रूपये प्रति शेअरवर हा समभाग व्यवहार करत होता. पीएसयु बँक श्रेणीत हा आकडा पार करणारी प्रथम बँक एसबीआय ठरली आहे. यापूर्वी एचडीएफसी व आयसीआयसीआय या बड्या खाजगी बँकांनी हा टप्पा पार केला आहे.
देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जात असलेल्या एसबीआय (State Bank of India SBI) आपला तिमाही निकाल ४ नोव्हेंबरला जाहीर केला होता. बँकेच्या फंडांमेंटल मध्ये जबरदस्त वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले होते. बँकेच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ६.४% वाढ झाली असून बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) ३.२८% वाढ नोंदवली गेली होती. प्रामुख्याने बँकेच्या असेट क्वालिटीतही मोठी सुधारणा झाली होती. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २०२९४ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ९% घसरण होत निव्वळ एनपीए (Net Non Performing Assets NPA) १८४६० कोटीवर पोहोचला होता. त्यामुळे निकालानंतर शेअर ५२ आठवड्यातील निचांकी (All time Low) ६७९.६५ पातळीवरून रिबाऊंड होत आज शेअरने ९७६.०० रूपये प्रति शेअर पातळी पार केली आहे. आकडेवारीनुसार ४४% सुधारणा या शेअर्समध्ये झाली असून बँकेच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा झाली होती.
सध्या अस्तित्वात असलेल्या पाच भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य ९ ट्रिलियन पेक्षा अधिक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टाटा कन्सल्टन्सी, सर्विसेस आणि आयसीआयसीआय बँक हे ₹९ ट्रिलियन पेक्षा जास्त बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांच्या यादीत आधीपासून समाविष्ट आहेत तर बँकेच्या श्रेणीत एचडीएफसी बँक (१५.२५ ट्रिलियन) आणि आयसीआयसीआय बँक (९.८३ ट्रिलियन) यांचा समावेश होता आता त्यात एसबीआयची भर पडली आहे.