मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. हवेत चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात बदल होताना दिसत आहेत. राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांपासून मराठवाड्यापर्यंत येत्या काही दिवसांतच तापमानात लक्षणीय घसरण होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ईशान्येकडून सतत येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे बहुतेक भागात थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईतही या आठवड्यात तापमानातील घट जाणवेल, असा अंदाज आहे.
यंदाचा हिवाळा कडक असेल, असेही सांगण्यात येते आहे. डिसेंबर ते जानेवारीदरम्यान देशातील बहुतेक भागात तापमान या काळातील नेहमीच्या तापमानापेक्षा बरेच कमी होऊ शकते. हे प्रामुख्याने 'ला निना'च्या प्रभावामुळे घडेल. प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात या प्रभावामुळे घट होईल. त्यामुळे, थंड वाऱ्यांची तीव्रता वाढेल आणि उत्तर भारतातील थंडीची लाट लांबेल.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, डिसेंबरमध्ये रात्रीचे तापमान नेहमीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने कमी होईल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये थंडीची तीव्रता सर्वात जास्त जाणवेल. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे तिथल्या पठारी भागातही थंडी पडेल.यावर्षी थंडीचा प्रभाव
फेब्रुवारीपर्यंत राहील.
ला निनाच्या प्रभावामुळे सामान्यतः पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो; हिवाळ्यात थंड वारे तीव्र होतात. धुक्यातील कमी दृश्यमानतेमुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन महिन्यांत दाट धुके आणि थंड लाटांचा इशारा जारी केला आहे. स्कायमेट वेदर सर्व्हिसच्या मते, हा ला निना कमकुवत असेल; परंतु थंडीच्या तीव्रतेवर त्याचा परिणाम स्पष्ट असेल. या काळात, उत्तर आणि मध्य भारतात सक्रिय पश्चिमी विक्षोभांमुळे बर्फवृष्टी वाढेल. यामुळे रात्रीच्या थंडीबरोबरच सकाळचे धुके आणि हवेतील आर्द्रता वाढते. राजस्थान आणि मध्य प्रदेशात हिवाळा आधीच आला आहे. सिकर आणि झुनझुनूमध्ये सोजनची सर्वात थंड रात्र नोंदवली गेली, तर भोपाळ, इंदूर आणि राजगडमध्ये तापमान सात अंशांपर्यंत पोहोचले. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात पारा ९ अंशाखाली घसरला. बिहार, पंजाब आणि हरियाणामध्येही तापमान सातत्याने कमी होत आहे. हवामान खात्याच्या मते, पुढील तीन ते चार दिवस मध्य प्रदेश, दक्षिण हरियाणा, ईशान्य राजस्थान आणि छत्तीसगडच्या काही भागात थंडीची लाट पसरेल.