प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
अॅलिसा कार्सन (Alyssa Carson), केवळ चोवीस वर्षांची ही मुलगी, जी मंगळ ग्रहावर जाणारी ‘पहिली मानव’ बनण्याच्या तयारीत आहे, अशी बातमी वाचली. कोणीही म्हणेल की किती आनंदाची बातमी आहे! अगदी खरं पण त्या बातमीचा पुढचा भाग बघा - ती मंगळ ग्रहावर गेल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर परत येऊ शकणार नाहीये! बापरे किती भयानक आहे हे! तरीही तिच्या मनात अजिबात चलबिचल नाही. भीती तर अजिबातच नाही, उलट या मंगळ प्रवासाला ती तिच्या आयुष्यातला मंगलमय प्रवास मानते. संपूर्ण मानव जातीसाठी समर्पण आणि बलिदानाचं प्रतीक मानते. जेव्हा मुली अशा काही धाडसी निर्णय घेऊ पाहतात तेव्हा त्यांना कुटुंबीयांकडून विरोध केला जातो; परंतु अॅलिसाच्या बाबतीत मात्र तिचे संपूर्ण कुटुंब तिच्या बाजूने आहे. या निर्णयासाठी त्यांनी तिला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे तसेच तिच्यावर विश्वास दाखवलेला आहे.
अॅलिसा खूप हुशार. तिला अंतराळ विज्ञानाची आवड होती. अतिशय लहान वयात तिने स्पेस कॅम्पमध्ये सहभाग नोंदवला. लहानपणापासूनच अॅलिसाने एक स्वप्न पाहिले होते की नासाच्या पहिल्या मंगळ मोहिमेत आपण सामील व्हावे.
२०३० मध्ये जी मंगळ मोहीम आयोजित केली आहे त्यासाठी अॅलिसा कार्सनची निवड झालेली आहे. अॅलिसा त्या सुंदर क्षणाची वाट पाहत आहे जेव्हा तिची पावलं लाल रंगाच्या ग्रहावर पहिल्यांदा पडतील!
आपल्याकडे अजूनही काही मुली मंगळ ग्रहदेवाच्या भोवती फेऱ्या मारत आहेत जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील ‘मंगळ’ ग्रहदोष निघून जावा आणि त्यांचा लग्नाचा मार्ग सुकर व्हावा.
जगामध्ये असे विरोधाभास नेहमीच पाहायला मिळतात. अजूनही चोवीस वर्षांच्या मुलांना आपण खूप लहान समजतो. त्यांच्यावर आपली मतं लादतो. साधा शिक्षणाचा निर्णय असेल किंवा लग्नाचा, आपण पालक म्हणून या मुलांच्या मतांचा गांभीर्याने विचार करत नाही. इथे अॅलिसासारखी मुलगी चक्क इतका मोठा निर्णय घेते आणि तिचे पालक तिला साथ देतात हे पाहून थक्क व्हायला होते.
कोणी एकेकाळी तेराव्या-चौदाव्या वर्षी मुलींची लग्नं व्हायची, अशा त्या वयात लग्न झालेल्या आणि आता आजी व पणजी झालेल्या काही स्त्रिया आजही समाजात कुठे कुठे भेटतात. म्हणजे अगदी त्या वयापासून त्या मुले-बाळे सांभाळून संसार व्यवस्थित करत होत्या असे दिसते. आता तर कायद्यामुळे इतक्या लहान वयात लग्न होत नाहीत पण तरीही आपल्या देशात पंचवीस वर्षांच्या होईपर्यंत मुलींना लहानच समजले जाते. अलीकडची याच वयाची मुले घराबाहेर पडून व्यवस्थित मजा मारत असतात, सिगरेट ओढत असतात, ड्रग्स सेवन करत असतात. याशिवाय आणखीही वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या मजा मारत असतात.
मला इथे अजिबात म्हणायचं नाही की अॅलिसासारखे कोणते तरी समर्पण तुम्ही कुटुंबासाठी, देशासाठी करा; परंतु कमीत कमी स्वतःचे शारीरिक-मानसिक आरोग्य आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन कसे करता येईल याचा तरी या वयात विचार करा!
मला सगळ्याच मुलांना एका पारड्यात तोलायचे नाही. आजची तरुणाई पूर्वीच्या तरुण मुलांपेक्षा खूप जास्त कष्ट करत आहे. डिजिटल जगाशी जोडलेली आहे. त्याचप्रमाणे या डिजिटल जगाचा चांगल्या-वाईट अर्थाने सामना करत आहे. त्यांना शरीर कमवायला निवांत वेळ मिळत नाही किंवा त्यांचे मानसिक आरोग्य स्पर्धेच्या युगामुळे बिघडलेले आहे. महागाई इतकी वाढली आहे आणि त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर त्यांच्या पद्धतीने जगताना त्यांच्याकडे फारसे पैसे शिल्लक राहत नाहीत त्यामुळे त्यांना आर्थिक नियोजन करता येत नाहीये.
आमच्या लहानपणी आई म्हणजे जणू ‘कोंड्याचा मांडा’ करण्यासाठीच जन्माला आली की काय असे वाटायचे! त्यामुळे आपल्या अवतीभवतीचे वातावरण, ताण, महागाई, अस्थिरता, अस्वस्थता हे सोबत घेऊनच आपण आपल्या आसपासच्या तरुणांना, जीवनातील कोंड्याचा थोडासा ‘आशावादी मांडा’ करून पाहण्याचा सल्ला देऊया! बाकी अॅलिसाची ही वास्तववादी कथा तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेच, याबद्दल शंका नाही.
पण तरीही ‘बाळ शिवाजी आपल्या घरी नाही तर शेजारच्या घरी जन्माला यावा!’ या विचाराच्या पालकांनी आपल्या मुलाला आयुष्यात सर्वार्थाने चांगला ‘माणूस’ बनवायचा फक्त विचार जरी मनात आणला तरी फार मोठी गोष्ट आहे कारण हे करताना त्यांना कुठेतरी ‘जिजाऊ’च्या दृष्टीचे व्हावे लागेल! आणि समाज सुधारायला वेळ लागणार नाही.






