कथा : रमेश तांबे
एक होता राजा. त्याचे राज्य खूप मोठे होते. त्याच्या राज्यातले लोक आनंदी आणि समाधानी होते. राजाने शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी चांगल्या सुविधा आपल्या राज्यात निर्माण केल्या होत्या. राजाचे सैन्यदल खूप मोठे आणि शक्तिमान होते. त्यामुळे आजूबाजूच्या कुठल्याही शत्रूची वाकडी नजर त्यांच्या राज्यावर पडत नसे. राजा मोठा शूर आणि पराक्रमी होता.
राजा भव्य अशा सुंदर महालात राहात असे. सर्व सुखे हात जोडून राजाच्या समोर उभी असली तरी राजाला एक खंत होती. मनात अपुरेपणाची भावना होतीे. ती म्हणजे आपले एकही चित्र कुठल्याही चित्रकाराने आतापर्यंत काढले नव्हते. ना लढाईत पराक्रम गाजवतानाचे, ना सिंहासनावर बसलेल्या रुबाबदार महाराजांचे! त्याला कारणही तसेच होते. ते म्हणजे राजा एका डोळ्याने अधू आणि एका पायाने अपंग होता. त्यामुळे अशा अपंग, दिसायला कुरूप अशा राजाचे चित्र कोण काढणार आणि कसे काढणार? असा विचार राज्यातल्या चित्रकारांपुढे नेहमीच पडलेला असे.
आपले एकही चित्र नसल्याची खंत राजाने आपल्या प्रधानाला सांगितली. मग प्रधानाने राज्यात दवंडी पिटवली की जो कोणी चित्रकार राजाचे सुंदर चित्र काढेल त्याला शंभर सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून मिळतील. पण त्याला चांगले चित्र काढायला नाही जमले तर तो तुरुंगवासास पात्र ठरेल. अशी दवंडी ऐकल्यावर काही चित्रकार राजाचे चित्र काढण्यात तयार झाले. ज्यांना माहीत होतं की आपला राजा अपंग आहे. पायाने अधू आणि त्याचा एक डोळा निकामी झालेला आहे त्यांनी आधीच या स्पर्धेतून माघार घेतली.
पण काही नवीन चित्रकार आपले नशीब आजमावण्यासाठी राजवाड्यात हजर झाले. पण पायाने अपंग आणि एका डोळ्याने अंध असलेला राजाला बघून त्यांनी राजाचे चित्र काढण्यास नकार दिला. कारण चित्र नाही आवडले तर तुरुंगवास नक्की होता. त्यात आपला राजा असा कुरूप! त्यामुळे एकही चित्रकार तयार होईना. एक महिना असाच गेला. एके दिवशी सकाळी १० वाजता अगदी खेडेगावातून एक चित्रकार राजवाड्यात हजर झाला. तो गरीब होता. पण होतकरू होता. चित्रकलेवर त्याचे नितांत प्रेम होते. शिवाय तो विचाराने, संस्काराने उत्तम असा चारित्र्यवान माणूस होता. कोणी चित्रकार आल्याचे कळताच राजा सिंहासनावर येऊन बसला. त्या तरुण चित्रकाराने राजाला नीट पाहिले. राजाचा एक डोळा निकामी झालेला होता. एका पायाने राजा अधू होता. अशा कुरूप दिसणाऱ्या राजाचे सुंदर चित्रे काढायचे कसे असा प्रश्न त्याच्या मनात उभा राहिला? तो थोडासा गोंधळला, पण नंतर सावरला आणि ठाम निश्चयाने म्हणाला, ‘‘महाराज मी आपले चित्र काढण्यास तयार आहे. पण माझी एक अट आहे. माझे चित्र पूर्ण होईपर्यंत ते कोणीही पाहू नये.’’ राजा त्यास तयार झाला अन् चित्र सुंदर नसल्यास तुरुंगवास मिळेल याची आठवण राजाने त्याला करून दिली. चित्रकाराने त्यास मान हलवून संमती दिली. मग तो दिवस उजाडला. राजवाड्यात जनता, चित्रकार मंडळी हजर होती. राजा, प्रधान आणि सर्व मंत्रिमंडळ हजर होते. राजा मोठा उत्सुक होता आपले चित्र पाहण्यासाठी. कारण हा चित्रकार अगदी गावखेड्यातून आला होता. राज्यातल्या जवळजवळ सर्व चित्रकारांनी राजाचे चित्र काढण्यास नकार दिला होता. राजवाड्याच्या मध्यभागी एका लाकडी फळ्यावर ते चित्र लावून ठेवले होते. ते रेशमी कपड्याने झाकलेले होते. मग राजाने मोठ्या उत्सुकतेने तो पडदा दूर केला अन् चित्र पाहताच राजा आनंदाने टाळ्या वाजवू लागला. चित्रकाराने एक पाय दुमडून आणि एक डोळा बंद करून बाण सोडण्याच्या तयारीत असलेल्या राजाचे चित्र काढले होते. ते इतके सुंदर आणि जिवंत दिसत होते की राजाने चित्रकाराला शंभर ऐवजी दोनशे मोहरा भेट दिल्या. मग राजाने चित्रकाराला विचारले, “एवढ्या सगळ्या चित्रकारांनी नकार दिला; परंतु तू न घाबरता माझे चित्र काढलेस तरी कसे? ”चित्रकार म्हणाला, “महाराज इतर चित्रकारांप्रमाणे मलाही आपल्याला बघून भीतीच वाटली. एका डोळ्याने अंध आणि पायाने अधू असलेल्या राजाचे सुंदर चित्र काढायचे तरी कसे? पण माझं मन विचार करू लागलं. आपण अपंग असूनही शूर आहात, पराक्रमी आहात. आपण आपल्या हिमतीवर एवढे मोठे राज्य निर्माण केले. आपल्या राज्यातली प्रजा सुखी-समाधानी आहे. याचाच अर्थ आपले बाह्य रंगरूप जरी कुरूप असले तरी, अंतरंग हे मात्र खूप सुंदर आहे. हा विचार मी केला आणि मग आपले चित्र शिकाऱ्याच्या रूपात काढायचे ठरवले. राजाला चित्रकाराच्या विचारांचा, त्याच्या कलेचा आणि बुद्धिमत्तेचा अभिमान वाटला. राजाने चित्रकाराला आपला राजचित्रकार म्हणून पदवी देऊन आपल्या जवळ ठेवून घेतले.






