Saturday, November 15, 2025

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड टॅक्सी महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई आणि उपनगरांतील प्रवास अधिक सोपा होणार आहे.

हा प्रकल्प एमएमआरडीएतर्फे राबवला जाणार असून लवकरच सुरूवात होणार आहे. पॉड टॅक्सी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरांना जोडणार असून, या तिन्ही शहरांमध्ये देशातील पहिली पॉड टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. सध्या या भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या तीव्र आहे. त्यामुळे पॉड टॅक्सी सुरू झाल्यानंतर या तिन्ही शहरांमधील प्रवास अधिक सहज आणि वेळेवर करता येणार आहे.

हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेतला गेला, जिथे अधिकाऱ्यांनी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलअंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रणालीमध्ये स्वयंचलित, उंचावर धावणाऱ्या पॉड टॅक्सीचा समावेश असेल. ही टॅक्सी प्रमुख शहरी मार्गांवर थेट आणि पॉइंट-टू-पॉइंट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे, ज्यामुळे पारंपरिक रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून लवकरच अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे. पीपीपी मॉडेलमुळे प्रकल्पाचे काम अधिक जलद आणि कार्यक्षमतेने पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या पॉड टॅक्सीची वैशिष्ट्ये अशी की, ही टॅक्सी पूर्णपणे स्वयंचलित असून केबल-ऑपरेटेड प्रणालीवर चालेल. मेट्रो आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचा हा उत्तम पर्याय ठरणार आहे. यामुळे मुंबई आणि उपनगरांतील वाहतूक कोंडीमध्ये मोठी घट होणार आहे.

Comments
Add Comment