दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरु असून खोदकामाच्या मातीखाली पाच कामगार गाडले गेले. इमारतीच्या पायासाठी खोदकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोन कामगार ठार झाले, तर तीन कामगार जखमी झाले.
भायखळा पश्चिमेकडील हबीब मेंशन इमारतीच्या इमारतीचा पायासाठी जमीन खोदण्याचे काम सुरु होते. या कामादरम्यान शनिवारी दुपारी माती कोसळून गंभीर दुर्घटना घडली. मातीखाली पाच मजूर गाडले गेले होते. या मजूरांना बाहेर काढून नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नायर रुग्णालयातील डॉ. पूनम यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण पाच मजूर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यापैकी दोन मजूर मृत अवस्थेत आणण्यात आले होते. तीन जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राहुल (३० वर्षे) आणि राजू (२८ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत, तर सज्जाद अली (२५ वर्षे), सौबत अली (२८ वर्षे), लाल मोहम्मद (१८ वर्षे) हे तिघे जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.