नवी दिल्ली : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४० टक्के भारतीयांनी कधी ना कधी सहकर्मचाऱ्यांसोबत रिलेशन ठेवले आहे. बदलती मानसिकता आणि ओपन रिलेशनशिपची वाढ स्पष्ट दिसते. कामाच्या ठिकाणी प्रेमसंबंध ही नवी गोष्ट नाही, पण भारतात हे संबंध मोठ्या संख्येने दिसत असल्याचा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय रिसर्चमधून समोर आला आहे. एशली मॅडिसन या सिक्रेट नातेसंबंधांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्लॅटफॉर्ममधील युगोव्हच्या सहकार्याने जगातील ११ देशांमध्ये हा रिसर्च केला. यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रिसर्चमधल्या यादीत मेक्सिको पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, भारत, इटली, मेक्सिको, स्पेन, स्वित्झर्लंड, यूके आणि यूएस या ११ देशांमधील एकूण १३,५८१ प्रौढ व्यक्तींवर हा अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणानुसार भारतीयांमध्ये ऑफिसमध्ये रिलेशनशिप मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र अनेक कंपन्या व्यावसायिक मर्यादा आणि वर्तनाच्या बाबतीत जागरूक होत आहेत. या रिसर्चमध्ये असे आढळले की, भारतातील दहापैकी चार जणांनी कधी ना कधी आपल्या सहकर्मचाऱ्यासोबत रिलेशनशिप ठेवले आहे किंवा सध्या ते रिलेशनशिपमध्ये आहेत. मेक्सिकोमध्ये हे प्रमाण ४३ टक्के आहे, तर भारतात ४० टक्के असल्याचे दिसले. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडासारख्या देशांत हे प्रमाण केवळ ३० टक्के आहे.
यामध्ये एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे पुरुषांनी महिलांच्या तुलनेत जास्त प्रमाणात सहकर्मचाऱ्यांसोबत प्रेमसंबंध ठेवले आहेत. पुरुषांचे प्रमाण ५१ टक्के तर महिलांचे ३६ टक्के आहे. यामुळे ऑफिस रिलेशनशिपमध्ये पुरुष जास्त जोखीम घेतात असे आढळले आहे. महिलांचा एक वेगळा दृष्टिकोनही समोर आला. जवळपास २९ टक्के महिलांचे मत आहे की, करिअरवर परिणाम होऊ शकतो म्हणून त्या ऑफिस रिलेशनपासून दूर राहतात. पुरुषांमध्ये हे प्रमाण २७ टक्के आहे. उलट पुरुषांना वैयक्तिक आयुष्य बिघडण्याची अधिक भीती वाटते. त्यापैकी ३० टक्के पुरुषांनी हे कारण सांगितले, तर महिलांमध्ये हे प्रमाण २६ टक्के आहे.
या अभ्यासातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की, तरुण पिढी ऑफिस रिलेशनबाबत जास्त सावध आहे. १८ ते २४ वयोगटातील ३४ टक्के तरुणांना अशा नात्यांमुळे करिअरवर परिणाम होऊ शकतो याची अधिक चिंता वाटते. भारत ऑफिस रोमॅन्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर येण्याचे कारण म्हणजे वाढती सामाजिक मोकळीक आणि नात्यांबाबतचे बदलते दृष्टिकोन. 'ओपन रिलेशनशिप' ही संकल्पना भारतात झपाट्याने स्वीकारली जात असल्याचे दिसते.






