ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरू झाले आहे. या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून बोगदे तयार केले जात आहे. त्यानिमित्ताने विविध वाहने, यंत्रांची वाहतूक करणारी वाहने या भागातून वाहतूक करणार आहे. या कामादरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.
हे वाहतूक बदल शुक्रवारपासून ते ११ मे २०२६ पर्यंत लागू केले आहेत. घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी, मानपाडा, ब्रम्हांड भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहन चालक मुल्ला बाग मार्गे वाहतूक करत असतात. येथील वाहतूक बदलाचा परिणाम वाहन चालकांना होण्याची शक्यता आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याणकरांना बोरिवली गाठण्यासाठी घोडबंदर मार्गाचा वापर करावा लागतो; परंतु या मार्गाची अवस्था अत्यंत वाईट आहे. घोडबंदर घाट रस्त्यात दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत असून कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे ठाणे-बोरिवली प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सध्या सुरू आहे.
बंदीची वेळ : रोज रात्री १:०० ते सकाळी ६:०० आणि दुपारी १२:०० ते सायंकाळी ६:०० बंद मार्ग : हिल क्रेस्ट सोसायटी, मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारा मार्ग पर्यायी मार्ग : हिल क्रेस्ट सोसायटी, मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारी वाहने नीलकंठ ग्रीनकडून मुल्ला बागकडे येणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग केलेल्या मार्गाने विरुद्ध दिशेने जातील. नियमातून वगळलेली वाहने : पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने.






