मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत एनडीएने जोरदार कामगिरी करत तब्बल २०२ जागांवर विजयाची नोंद केली. तर महागठबंधनाला केवळ ३५ जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालानंतर राजकीय चर्चांना वेग आला असून अनेक नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
शरद पवारांनी बिहारच्या निवडणुकीवर भाष्य करताना म्हटलं की, महिलांनी मोठ्या प्रमाणावर एनडीएला मतदान केलं आणि त्यामागे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या १० हजार रुपयांच्या योजनेचा प्रभाव दिसतो.
पुढे ते म्हणाले “महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी सरकारी योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात आली. भविष्यात सत्ताधारी पक्षांनी अशा पद्धतीने निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर लोकशाहीवरील विश्वास ढळू शकतो. एवढ्या मोठ्या रकमेचं वाटप योग्य आहे का, निवडणूक आयोगाने याचा गांभीर्याने विचार करावा.”
“जो जीता वही सिकंदर” फडणवीसांचा पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार यांनी बिहारमधील महिलांना १० हजारांची मदत देणाऱ्या योजनेमुळे मतदानात परिणाम झाला, अशी टीका केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, “जो जीता वही सिकंदर. पराभवानंतर आपली चूक मान्य करणं हे विरोधकांना जमत नाही. आमच्या योजना लोकांना आवडल्या म्हणून त्यांनी मतदान केलं. मग त्यात दोष कोणाचा? तुमच्या सरकारच्या काळात तुम्ही अशा योजना राबवल्या नाहीत, ही आमची चूक कशी?”
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते, लोकशाही प्रक्रियेत जनता प्रामाणिकपणे आपले मत विकासाला करते, आणि योजनांचा प्रभाव हे नैसर्गिक आहे, आरोप करण्याचा विषयच येत नाही.