६ डिसेंबरला ब्लास्ट करण्यासाठी एक-दोन नव्हे, तब्बल ३२ कारचा होणार होता वापर
नवी दिल्ली : दिल्ली कार ब्लास्ट प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा दहशतवाद्यांच्या भीषण कारस्थानांचा पर्दाफाश होत आहे. आतापर्यंत केवळ चार कारांपर्यंत मर्यादित वाटणाऱ्या ‘व्हाईट कॉलर टेरर’ कटाचा विस्तार आता तब्बल ३२ कारपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महतत्वाचे म्हणजे, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी या कारचा वापर ६ डिसेंबर रोजी, बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचा ‘बदला’ घेण्यासाठी करण्याचा प्लॅन आखल्याचे तपासामध्ये समोर आले आहे.
या सर्व कारची तयारी स्फोटके वाहून नेणे आणि स्फोट घडविणे यासाठी सुरू होती. सोमवारी झालेल्या स्फोटात वापरलेली ह्युंदाई आय२० ही त्यांपैकी एक कार. याशिवाय मारुती ब्रेझा, स्विफ्ट डिजायर आणि फोर्ड इकोस्पोर्ट या कारही जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व कारचा वापर ६ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांसाठी करण्यात येणार होता. महत्त्वाचे म्हणजे, हल्ल्यांसाठी जी ठिकाणे निवडण्यात आली होती, त्यांतील ६ ठिकाणे एकट्या एकट्या दिल्लीत होती, असे सांगण्यात येत आहे.
ज्या कार आतापर्यंत वापरल्या गेल्या, त्या जुन्या आणि अनेकांना विक्री झालेल्या असल्याने वापरण्यात आल्या. पोलिसांना कटाच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे अवघड व्हावे, हा या मागचा हेतू. आतापर्यंत तीन कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत, तर चौथी कार स्फोटात उडवण्यात आली.
स्फोटातील मृताचा हात दुकानाच्या छतावर
दिल्ली स्फोटाला २ दिवस होऊन गेले आहेत. पण दिल्ली पोलिसांसह तपास यंत्रणांना आताही पुरावे आणि मृतदेहांचे अवयव सापडत आहेत. गुरुवारी सकाळी बॉम्ब स्फोट झालेल्या ठिकाणापासून ३०० मीटर दूर असलेल्या एका दुकानाच्या छतावर एका माणसाचा हात सापडला आहे. स्फोट झाल्यानंतर कारच्या जवळ असलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या. त्याचा हात शरीरापासून वेगळा होऊन न्यू राजपत रॉय मार्केटमधील दुकानाच्या छतावर जाऊन पडला. दिल्ली पोलीस घटनास्थळाची पाहणी करत होते. घटनास्थळावरून पुरावे गोळा करतानाच पोलिसांना दुकानाच्या छतावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत हात आढळून आला. त्यांनी हात ताब्यात घेतला. त्याची अवस्था पाहून तपास अधिकाऱ्यांना धक्का बसला.
दिल्ली स्फोट प्रकरणात डॉ. फारुकला अटक
दिल्लीतील भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यातील जी. एस. मेडिकल कॉलेजमधील प्रसूती विभागातील असिस्टंट प्राध्यापक डॉ. फारुक याला ताब्यात घेतले आहे. डॉ. फारुकने हरियाणातील फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमडी पदवी प्राप्त केली होती. तपास यंत्रणांना संशय आहे की, या विद्यापीठातील काही इतर डॉक्टरांप्रमाणेच डॉ. फारुकचेही दहशतवादी संघटनांशी संबंध असू शकतात. हापूडमधून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी दिल्लीला नेले असून, त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत अटक झालेल्यांमध्ये अल-फलाह विद्यापीठातील डॉ. मुजम्मिल गनई, त्याची मैत्रीण डॉ. शाहीन शाहिद, सहारनपूरमधील फेमस हॉस्पिटलचा डॉ. आदिल अहमद राठर, तसेच डॉ. शाहीनचा भाऊ डॉ. परवेज अन्सारी यांचा समावेश आहे.