मुंबई : अडीचशे कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्स घोटाळ्यात मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद सलीम सुहेल शेखने चौकशीत हादरवून टाकणारा खुलासा केला आहे. देश-विदेशात अनेक प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार आणि काही राजकीय व्यक्तींसाठी खास ड्रग्स पार्ट्या आयोजित केल्याची माहिती त्याने दिली आहे.
या पार्टींमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, निर्माता-दिग्दर्शक अब्बास–मस्तान, माजी आमदार झिशान सिद्दीकी, अभिनेत्री नोरा फतेही, इन्फ्लुएन्सर ओरी उर्फ ओरहान, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर, तसेच रॅपर लोका यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सलीम शेखला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करून भारतात आणण्यात आले होते. गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. कोठडी वाढवून मागताना पोलिसांनी चौकशीदरम्यान त्याच्याकडून समोर आलेली ही संवेदनशील माहिती न्यायालयाला दिली.
मुंबई पोलिसांनी कुर्ला येथून परवीन बानो गुलाम शेख या महिलेला १६ फेब्रुवारी २०२४ रोजी तब्बल २५ कोटी रुपयांच्या मेफेड्रॉनसह पकडले होते. या अटकेनंतर अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांची साखळी एकामागोमाग एक उघडकीस येत गेली. तपास वाढत गेला तसे चित्र आणखी धक्कादायक होत गेले. आतापर्यंत या प्रकरणात १५ जणांना अटक झाली असून, एमडीचे ड्रग्स ची किंमत जवळपास २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
परवीनला मिरा रोड येथील साजिद मोहम्मद आसिफ शेख हा ड्रग्ज पुरवत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या चौकशीत या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार सलीम शेख असल्याचा उलगडा झाला. सलीम दुबईत बसून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मेफेड्रॉन उत्पादन व वितरणाचे जाळे चालवत होता. कच्चा मालही विविध राज्यांतून मागवला जात असल्याचे निष्पन्न झाले.
या रॅकेटचा माग काढताच त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आणि यूएई पोलिसांनी त्याला ताब्यात घेत भारतात सुपूर्द केले. चौकशीत सलीमने ड्रग्ज पुरवठ्यासह स्वतःही ड्रग्ज सेवन केल्याची कबुली दिली आहे.
सलीमने आयोजित केलेल्या ड्रग्स पार्ट्या मुंबई, गोवा आणि दुबई येथील लक्झरी लोकेशन्सवर झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः विदेशातील पार्ट्यांमध्ये एमडीऐवजी चरस आणि कोकेनचा पुरवठा केल्याचा दावा चौकशीत करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत असून लवकरच आणखी काही प्रसिद्ध नावे समोर येण्याची शक्यता आहे.