पाटणा : बिहार विधानसभेच्या निकालांत एनडीएला मोठं यश मिळाल्यानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. बिहारच्या जनतेनं स्पष्ट बहुमत देत एनडीए सरकारला मार्ग मोकळा करून दिला आहे. या विजयावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठा निशाणा साधला आहे.
फडणवीस म्हणाले की, “बिहारच्या नागरिकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. लोकांनी विकासाला मत दिलं आहे. या वेळची स्थिती २०१० मधील विक्रमालाही मागे टाकेल.” चिराग पासवान, मांझी, उपेंद्र कुशवाहा आदी मित्रपक्षांनाही जनतेनं मोठा प्रतिसाद दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
काँग्रेस आणि राहुल गांधीने देशभरात चालवलेल्या प्रचारावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “सतत घटनात्मक संस्थांवर टीका करणे, सरकारच्या कार्यपद्धतीवर बिनबुडाचे आरोप करणे, या सर्व गोष्टींमुळेच काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. राहुल गांधी ज्या पद्धतीने आरोपांच्या राजकारणात मग्न आहेत, त्याचा परिणाम निवडणुकांमध्ये दिसत आहे. बिहारमध्ये तर काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात कमी आकडा नोंदवला गेलाय.”
राहुल गांधींनी मांडलेल्या ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर त्यांनी व्यंगात्मक भाष्य करत, लोकांचा पूर्ण विश्वास मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर असल्याचं सांगितलं. तसेच काँग्रेस आणि इतर महाआघाडीने आता गंभीर आत्मपरीक्षण करायला हवं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
फडणवीस यांनी सांगितलं की, “बिहारच्या निवडणुकांत जातीय समीकरणं किंवा इतर मुद्द्यांपेक्षा विकास आणि सुशासन यांनाच लोकांनी प्राधान्य दिलं. मागील काळात जिथे थोडी नाराजी दिसत होती, यावेळी मात्र प्रो-इन्कम्बन्सीची लाट होती. आम्हाला १६० जागा मिळणार अशी अपेक्षा होती, परंतु त्याहीपेक्षा मोठा विजय मिळाला.”
या निकालांनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न उपस्थित होत असताना फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “हा निर्णय आमचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व तसेच नितीश कुमार हे एकत्रितपणे घेतील. मुख्यमंत्री कोण होणार यावर वक्तव्य करण्याचा अधिकार मला नाही.” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.