मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. हा हप्ता मिळवण्यासाठी महिलांना ई-केवायसी करण्याचे बंधन आहे. ई-केवायसी करताना येणाऱ्या अडचणींवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वेबसाईटमध्ये बदल होत असल्याने ई-केवायसीला वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या महिलांचे पती आणि वडील नाहीत, त्यांच्यासाठी वेबसाईटमध्ये विशेष बदल केले जात असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि कोणतीही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वेबसाईटचे अपग्रेडेशन पूर्ण झाले की, महिलांना ई-केवायसी करणं सोपं होईल. या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळेल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. सप्टेंबर महिन्याचा हप्ता दहा ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता. आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता यायचा आहे. पण अनेक महिलांना ई-केवायसी करताना समस्या जाणवत आहे. यामुळे महिला पैसे मिळणार की नाही या चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वेबसाईटमध्ये बदल होत असल्याने ई-केवायसीला वेळ लागत आहे. पण लवकरच परिस्थिती सुधारेल. कोणतीही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे सक्तीचे आहे. ई-केवायसी केल्याशिवाय पुढील हप्ता खात्यात जमा होणार नाही. राज्य शासनाने ई-केवायसी करण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत दिली आहे. ही मुदत संपण्याआधी ई-केवायसी करा असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना केले आहे.