मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती सध्या नाजुक असून, त्यांच्या आरोग्याबद्दल सिनेरसिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तब्बल बारा दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज (Discharged From Hospital) दिला आहे. सध्या त्यांच्या मुंबईतील घरीच त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. घरी परतल्यानंतर धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी सिनेजगतातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. पत्नी हेमा मालिनी, मुलगी ईशा देओल, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन तसेच अनेक चित्रपट निर्माते त्यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना भेटून जाणाऱ्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर एक चिंता स्पष्टपणे दिसत होती. यामुळे चाहत्यांमध्ये आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या तब्येतीबाबत जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुकता वाढली आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीमुळे चिंतेत असलेले त्यांचे चाहते त्यांच्या मुंबईतील घराबाहेर मोठी गर्दी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचे मोठे चिरंजीव सनी देओल (Sunny Deol) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 'सनी पाजी' गर्दीमुळे आणि प्रकृतीमुळे आलेला ताण चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असल्याने फारच चिडलेला दिसत आहे.
पॅपाराझींच्या गर्दीमुळे सनी देओल संतापला
या वाढलेल्या गोंधळामुळे आणि गोपनीयतेचा भंग होत असल्यामुळे धर्मेंद्र यांचे पुत्र अभिनेता सनी देओल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज (गुरुवारी) सकाळी अभिनेता सनी देओल त्याचे वडील धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी घरी पोहोचला. त्याचवेळी त्याला घराबाहेर पॅपाराझींचा गराडा दिसला. या गर्दीमुळे सनी देओलचा पारा चढला आणि त्याने उपस्थित माध्यमांना फटकारले. गेल्या काही काळापासून देओल कुटुंबीय आणि त्यांच्या टीमने माध्यमांना गोपनीयतेचा आदर करण्याची वारंवार विनंती केली आहे, तरीही पॅपाराझींनी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. याचवेळी सनी देओलचा संतापलेला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. वडिलांच्या नाजूक प्रकृतीमुळे अत्यंत भावनिक आणि तणावाच्या काळात माध्यमांनी गोपनीयतेचे भान ठेवावे, अशी अपेक्षा देओल कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एक्स (X), फेसबुक किंवा इन्स्टाग्राम स्क्रोल केलं ...
'तुम्हाला लाज वाटत नाही का?'
अभिनेता सनी देओल सध्या प्रचंड तणावात आहे. याच तणावाच्या आणि दुःखाच्या वातावरणात घराबाहेर जमलेल्या पॅपाराझींच्या गर्दीवर सनी देओलचा संयम सुटला आणि तो त्यांच्यावर चिडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गुरुवारी सकाळी सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी घरी जात असताना तो स्पॉट झाला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, चेहऱ्यावर दुःख: सनी देओलच्या चेहऱ्यावरची चिंता आणि दुःख स्पष्टपणे दिसत आहे. तो मान खाली घालून घराकडे चालत असताना, एक पॅपाराझी ओरडतो, "हा सनी देओल आहे..." हे ऐकताच चिंतेत असलेला सनी देओल अचानक थांबतो आणि त्याचा संयम सुटतो. सनी देओलने पॅपाराझींसमोर उभे राहून आधी हात जोडले, पण लगेचच चिडून त्यांना फटकारले. या व्हिडीओमध्ये सनी देओल पॅपाराझींना उद्देशून स्पष्टपणे म्हणताना दिसतोय की, "तुम्हाला लाज वाटत नाही का? तुमच्या घरी आई-वडील आणि मुलं आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी असे व्हिडीओ बनवताय आणि पाठवताय... तुम्हाला लाज वाटली पाहिजे..." सनी देओलचा हा राग त्याच्या वडिलांच्या नाजूक प्रकृतीमुळे आणि खासगी आयुष्यातील तणावामुळे आलेला असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीवर हेमा मालिनी भावूक; म्हणाल्या, "हा कठीण काळ आहे, प्रार्थना करा"
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी माध्यमांसमोर भावनिक प्रतिक्रिया देत हेल्थ अपडेट दिली आहे. त्यांनी कुटुंबासाठी हा खूप कठीण काळ असल्याचे सांगितले. धर्मेंद्र यांच्या सध्याच्या प्रकृतीबद्दल बोलताना हेमा मालिनी भावूक झाल्या. त्यांनी कुटुंबातील सदस्यांवर असलेल्या ताणाबद्दल सांगितले, "हा माझ्यासाठी खूपच कठीण काळ आहे... धरमजींची तब्येत आमच्यासाठी खूप चिंतेचा विषय आहे. त्यांची मुलं रात्री झोपू शकत नाहीत," अशा शब्दांत त्यांनी कुटुंबाच्या भावना व्यक्त केल्या. त्या पुढे म्हणाल्या, "सध्या मी अजिबात खचून जाऊ शकत नाही, खूप जबाबदाऱ्या आहेत." रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतल्याचा एक मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले, "ते रुग्णालयातून बाहेर पडले आणि घरी परत आले, याचा आम्हाला मोठा दिलासा आहे. त्यांना त्यांच्या लोकांमध्ये राहण्याची गरज आहे." शेवटी, हेमा मालिनी यांनी देवावर आणि लोकांच्या प्रार्थनेवर विश्वास व्यक्त करत आवाहन केले: "बाकी सर्व काही देवाच्या हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा."