Wednesday, December 24, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

नाशिक : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेन्ट’ योजनेंतर्गत ९९ कोटी चौदा लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार दिलीप बनकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कल्पना नायर, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकाल पथाची माहिती जाणून घेतली. रामकाल पथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग, रामकाल पथवरील संपूर्ण संरचनांचे संवर्धन, दर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. रामकुंड, सीता गुंफा, काळाराम मंदिर, राम लक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रकल्पामुळे भाविकांपर्यंत पोहोचेल.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्यादृष्टीने नाशिकचे सांस्कृतिक महत्त्व जगभरात पोहोचविण्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या साह्याने हा प्रकल्प उभारला जात आहे. देशभरातून गोदातटी येणाऱ्या भाविकांसाठी आनंददायी अनुभव देण्याच्या दृष्टीने आणि या पवित्र स्थळाचे स्थान महात्म्य त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. रामकाल पथ प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काळाराम मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर विश्वस्तांतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Comments
Add Comment