Tuesday, November 11, 2025

Red Fort Blast : षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही!' दिल्ली स्फोटावर पंतप्रधान मोदींचा मोठा इशारा; दोषींवर कठोर कारवाईचे संकेत

Red Fort Blast : षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही!' दिल्ली स्फोटावर पंतप्रधान मोदींचा मोठा इशारा; दोषींवर कठोर कारवाईचे संकेत

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort Blast) झालेल्या कार स्फोटानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या भयंकर घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर भूमिका घेत, दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा ठाम इशारा दिला आहे.

भूतानहून मोदींची प्रतिक्रिया : “षड्यंत्रकार्‍यांना सोडणार नाही”

भूतान दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “या स्फोटामागील षड्यंत्रकार्‍यांना सोडलं जाणार नाही. सर्व दोषींना न्यायाच्या कठघऱ्यात उभं केलं जाईल.” मोदी पुढे म्हणाले, “मी आज येथे अत्यंत दुःखी मनाने आलो आहे. काल सायंकाळी दिल्लीमध्ये झालेल्या भयावह घटनेने सर्वांनाच हादरवले आहे. मी पीडित कुटुंबियांच्या वेदना समजू शकतो. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. मी काल रात्रीपासून तपास यंत्रणांशी सतत संपर्कात आहे. या कटामागे असलेल्या प्रत्येकाचा शोध घेतला जाईल आणि कोणालाही वाचू दिलं जाणार नाही.”

रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांचीही कठोर भूमिका

रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “दिल्लीतील या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या सर्व लोकांबद्दल मी अत्यंत शोक व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात धैर्य मिळावे, अशी प्रार्थना करतो.” राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “दिल्ली पोलिस, एनआयए आणि एनएसजी या सर्व प्रमुख तपास यंत्रणा या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. तपास जलद गतीने सुरू असून लवकरच त्याचे निष्कर्ष जनतेसमोर येतील. कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही. राजधानीच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी सरकारने आधीच आवश्यक निर्देश दिले आहेत. हे राष्ट्रीय सुरक्षेचं प्रकरण आहे आणि अशा कृती कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत.”

UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; दहशतवादी कटाचा संशय

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात गैरकानूनी उपक्रम (प्रतिबंध) कायदा – UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपास आणि गुप्तचर अहवालांनुसार हा आतंकी कट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा स्फोट हरियाणातील फरीदाबादमध्ये २,९०० किलो स्फोटक जप्त झाल्यानंतर केवळ काही तासांतच घडला. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. स्फोट इतका तीव्र होता की लाल किल्ल्याजवळचा परिसर हादरून गेला आणि काही मिनिटांतच गोंधळ उडाला. पोलिसांनी नागरिकांना अफवा आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर शेअर न करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, पीडितांच्या कुटुंबीयांनी तातडीने न्याय मिळावा आणि राजधानीतील सुरक्षेची पातळी अधिक वाढवावी, अशी मागणी केली आहे.

सध्या तपास जलद गतीने सुरू

NIA, NSG आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखा या सर्व यंत्रणा या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्फोटात वापरलेली कार, स्फोटकांचे नमुने आणि साक्षीदारांचे निवेदन यांचा सखोल अभ्यास सुरू आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक अहवालानुसार, स्फोट हा नियोजित कटाचा भाग असावा, असा ठाम संशय व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >