मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके
सख्यांनो, हे शीर्षकच किती आकर्षक आहे नाही ? सुंदर कोणाला व्हावंसं वाटत नाही ? चार जणांचं लक्ष आपल्याकडं वेधलं जावं अशी बहुतांश लोकांची इच्छा असते ? पण सौंदर्य म्हणजे नेमकं काय ? योग आणि सौंदर्य यांचा
काय संबंध ?
सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीला जे सुंदर वाटेल ते दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीला सुंदर दिसेलच असं नाही. अर्थात प्रत्येकाची सौंदर्याची कल्पना वेगवेगळी असते. देशकाळानुसारही सौंदर्याच्या कल्पना बदललेल्या आपल्याला दिसतात. तरीही आपल्या देशाचा विचार करता सौंदर्याचे काही निकष ठरलेले आहेत. हे निकष प्रामुख्यानं बाह्यसौंदर्याविषयी अर्थातच देहाच्या सौंदर्याविषयी आहेत असं दिसतं. जसं प्रमाणबद्ध शरीर, नितळ गोरा रंग, लांब केस इत्यादी. दूरदर्शनवरील अधिकाधिक जाहिराती शारीरिक सौंदर्य वाढवण्यासाठीच असतात असं दिसतं; परंतु आपल्या व्यक्तित्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं अंतरंग. अंतरंगाचंही सौंदर्य असतं. खरं तर ते अधिक महत्त्वाचं, प्रभावी आणि आजीवन आपल्यासह राहतं.
बाह्यसौंदर्य वाढत्या वयानुसार कमी कमी होत जाणारं अल्पजीवी असतं. ते टिकवायचा कितीही प्रयत्न केला तरी व्यर्थ.
अंतरंग सौंदर्य म्हणजे नक्की काय? अंतरंग सौंदर्य म्हणजे संतुलित मन, नियंत्रित भावना, संतुलित बुद्धी, आणि प्रिय व सत्य बोलणारी वाणी. हे अंतरंग सौंदर्य मनुष्याच्या वर्तणुकीतून, बोलण्यातून, त्याच्या चेहऱ्यावरील समाधान आणि हास्यातून प्रतीत होतं. आपल्या संस्कृतीत या आंतरिक सौंदर्याचं महत्त्व अनेक प्रकारे पटवून दिलं आहे.
परंतु अलीकडच्या काळात, पाश्चिमात्य विचारसरणी आणि सौंदर्याच्या कल्पनांचा पाठपुरावा करणाऱ्या आपण आंतरिक सौंदर्याकडे जणू पाठ फिरवली आहे. शारीरिक सौंदर्यासाठी नित्य नियमित योगसाधना, शुद्धिक्रिया, प्राणायाम, शवासन, आहार-नियंत्रण यांचा पुष्कळ उपयोग होतो. सर्व प्रकारच्या योगासनांच्या साधनेनं शरीर बांधेसूद, डौलदार आणि चपळ होतं. ब्रह्ममुद्रा, सिंहमुद्रा यांसारख्या मुद्रांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य खुलून येतं. नेत्रशुद्धी आणि नेत्रशक्ती त्राटकासारख्या क्रियांनी प्राप्त होते. आपल्या दैनिक वेळापत्रकात थोडा वेळ योगसाधनेसाठी दिला तरी हे शारीरिक सौंदर्य प्राप्त करणं तितकं
कठीण नाही.
मनाचं सौंदर्य वाढवण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. मन ही मोठी अजब आणि जादुई गोष्ट माणसाला परमेश्वरानं दिली आहे. संकल्प आणि विकल्प ही मनाची कार्यं आहेत. आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींची जाणीव आपल्याला मनामुळे होत असते.
कल्पनाशक्ती हाही मनाचा खूप मोठा गुण आहे. मनामुळेच आपण अनेक बरेवाईट प्रसंग अनुभवत असतो. म्हणूनच सृष्टीमध्ये जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी संस्कारित, सुंदर मनाची आवश्यकता आहे. विश्वातल्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आणि सद्गुण पाहण्याची दृष्टी जाणीवपूर्वक निर्माण करायला लागते आणि जोपासायलाही लागते. हे काम मनाचं आहे. मनाचा आणखीन एक गुणधर्म म्हणजे एखाद्या गोष्टीची गोडी मनाला लावली की मन त्या गोष्टीशी नेहमीच जोडलं जातं. चांगलंच पाहण्याची गोडी मनाला लावली की मन सगळ्या वस्तूंमध्ये आणि अनुभवांमध्ये चांगलं पाहू लागतं. आपोआप सकारात्मक, स्थिर आणि पर्यायानं समाधानी आणि आनंदी होतं. मात्र आनंददायी आणि चांगल्या गोष्टींची गोडी मनाला लावणं आपल्याला जमलं पाहिजे. यासाठी आपल्या मनाशी आपली मैत्री झाली पाहिजे. ही मैत्री करायची असेल, तर आपलं मन आपल्याला कळलं पाहिजे.
आपलं मन आपल्याला कळण्यासाठी ते स्थिर व्हायला हवं. आणि मन स्थिर करायचं तर प्राणायाम ही पहिली पायरी आहे. प्राणायामानं मन स्थिर झालं की धारणा, ध्यान इत्यादी उपायांनी ते अधिक सक्षम आणि संवेदनाशील करता येतं. संवेदनाशील मनाला खऱ्या अर्थानं सौंदर्याचा सहज साक्षात्कार होतो. अशा संवेदनशील मनाला लहान लहान गोष्टींमध्ये आणि लहान लहान कृती करतानासुद्धा सौंदर्य दिसू लागतं. लहानसहान गोष्टींत होणारी सौंदर्याची जाणीव मनाला पराकोटीचं समाधान आणि नित्य आनंद देते. मनातला आनंद स्वाभाविकपणे आपल्या चेहऱ्यावर, शारीरिक हालचाली आणि कृतींमध्ये आविष्कृत व्हायला लागतो. अशी नित्य आनंदी, समाधानी असणारी व्यक्ती बाह्यसौंदर्याच्या निकषांमध्ये बसणारी नसेल कदाचित पण तरीही ती सुंदर दिसते. तिचं सौंदर्य, तिच्या समाधानी चेहऱ्यात, आनंदी स्मितहास्यात आणि कृतींच्या सहजतेत असतं. हे सौंदर्य मनातूनच फुलून आल्यामुळे त्याला स्थळ, काळ आणि वयाची मर्यादा नसते.
मनाचं सौंदर्य सांगणारी एक सुंदर कथा आहे. श्रीमंतीची इच्छा असणारा एक मनुष्य परिसाच्या शोधात होता. एकदा त्याला कळलं की एका स्वामींकडे परिस आहे. तो त्या स्वामींकडे परिस मागायला गेला. मागताक्षणी स्वामींनी त्याला परिस दिला. परिसासारखी मूल्यवान गोष्ट स्वामींनी तत्काळ आपल्याला द्यावी यांचं त्याला मोठं आश्चर्यच वाटलं. अत्यानंदानं स्वामींना नमस्कार करून तो तिथून निघाला; परंतु थोड्याच वेळात त्याच्या मनात आली की ज्या अर्थी स्वामींनी आपल्याला परिस इतक्या सहजतेनं दिला त्याअर्थी त्यांच्याकडे याहूनही अधिक काहीतरी मूल्यवान असलं पाहिजे. तो पुन्हा त्या स्वामींकडे गेला आणि त्यांनी हा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले परिसापेक्षा अधिक मूल्यवान गोष्ट माझ्याकडे आहे ती म्हणजे माझं मन.
ते पुढे म्हणाले खरंतर मन सगळ्यांनाच दिलेलं आहे; परंतु कस्तुरीमृगाला ज्याप्रमाणे आपल्यामध्ये असलेल्या कस्तुरीची जाणीव नसते त्याप्रमाणे ईश्वरानं दिलेल्या परिसापेक्षाही अधिक मूल्यवान असलेल्या मनरूपी देणगीची जाणीव आपल्याला नाही. परिसानं केवळ लोखंडाचं सोनं होतं पण सुंदर मनाचा ज्या गोष्टीला स्पर्श होतो त्या सगळ्याच गोष्टी सुंदर होत जातात. हे ऐकून परिस तिथेच ठेवून तो मनुष्य परत निघून गेला. अशा मूल्यवान मनाचं सौंदर्य ओळखण्याचं प्रभावी साधन म्हणजे योग हे सांगायला नको.