तक्रार नोंदविण्यास पोलीसांची टाळाटाळ
ठाणे : ढोकाळी येथील हायलँड पार्क रोड येथे असलेले ५० वर्षे जुने कुलदैवताचे मंदिर मूर्तींसह गायब झाल्याची तक्रार पोलीस नोंदवून घेत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी आज आमदार संजय केळकर यांच्याकडे केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केल्याची माहिती आ. केळकर यांनी दिली. भाजपचे खोपट येथील कार्यालयात आयोजित 'जनसेवकाचा जनसंवाद' या कार्यक्रमात ढोकाळी येथील ग्रामस्थांनी आ.केळकर यांची भेट घेतली. मागण्यांचे निवेदन त्यांना सुपूर्द करण्यात आले आहे.
नवरात्रीनिमित्त २० सप्टेंबर रोजी मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना देवांच्या मूर्ती, चांदीचे सामान आणि मंदिरही गायब झाल्याचे आढळून आले. तर जवळील विहिरही बुजवण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी आ. केळकर यांच्याकडे केली आहे.
सोमवारी या कार्यक्रमात आ. केळकर यांच्याकडे अनेक प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात विकासकाने घरांसाठी केलेली फसवणूक, शैक्षणिक विभाग, ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक, नोकरी अशी अनेक विषयांबाबत निवेदने प्राप्त झाली आहेत. यावेळी जनसंवाद कार्यक्रमास माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, युवा मोर्चाचे सुरज दळवी, जितेंद्र मढवी, मेघनाथ घरत, सचिन पाटील आदी उपस्थित होते.






