डॉ. सर्वेश सुहास सोमण
लेन्सकार्ट आयपीओचा प्राईस बँड २७ ऑक्टोबर रोजी घोषित करण्यात आला होता. त्याचा प्राईस बँड ३८२ ते ४०२ रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित करण्यात आला होता. त्याच दिवशी त्याचा जीएमपी १०८ रुपये झाला होता. त्यानुसार, या आयपीओची २६.८७% प्रीमियमसह ५१० रुपयांवर लिस्ट होण्याची अपेक्षा होती; परंतु नंतर त्याच्या जीएमपीमध्ये चढ-उतार होत राहिला आणि आता तो एकदम खाली आला आहे.
जीएमपी म्हणजे काय?
जीएमपी (ग्रे मार्केट प्रिमिअम) म्हणजे ग्रे मार्केटमध्ये (अनधिकृत बाजारात) त्या आयपीओच्या शेअर्ससाठी मिळणारा अतिरिक्त भाव. हा बाजार अधिकृत नसतो, पण गुंतवणूकदार आयपीओ लिस्टिंगपूर्वी शेअर्स खरेदी-विक्रीबद्दल आपापसात व्यवहार करतात. यातून त्या आयपीओबद्दल लोकांची मागणी आणि भावना समजते.
जीएमपीमध्ये घसरण का झाली?
जीएमपीमधील ही मोठी घसरण दर्शवते की अनौपचारिक बाजारातील व्यापारी लिस्टिंगपूर्वी सावध झाले आहेत. लिस्टिंगच्या उत्साहात झालेली ही घट, कंपनीचं मूल्यांकन आणि शेअर बाजारातील सध्याची स्थिती यांसारख्या चिंतांमुळे झाली आहे.
आयपीओला जबरदस्त सबस्क्रिप्शन
मूल्यांकनाची चिंता असतानाही, या आयपीओला जबरदस्त सबस्क्रिप्शन मिळाले आहे. या इश्यूचा आकार ७,२७८ कोटी रुपये होता आणि हा सन २०२५ च्या सर्वात मोठ्या ग्राहक आयपीओपैकी एक आहे. याला १ लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीची बिड्स मिळाली, म्हणजेच हा आयपीओ २८.३ पट सबस्क्राइब झाला.
संस्थात्मक गुंतवणूकदारांनी यात सर्वाधिक रस दाखवला. क्यूआयबीचा (क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स) हिस्सा ४५ पट सबस्क्राइब झाला, जे विदेशी आणि देशांतर्गत फंडांचा मजबूत विश्वास दर्शवतो. बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १८ पट सबस्क्रिप्शन दिले, तर किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग सुमारे ७.५ पट राहिला आहे.
मागील ७ ट्रेडिंग सेशन्सचा विचार करता निर्देशांकात मोठ्या तेजीनंतर मोठी घसरण पहावयास मिळालेली आहे. पुढील आठवड्याचा विचार करता निर्देशांकात पुन्हा तेजी होणे अपेक्षित आहे. आत्ता निर्देशकांची गती जरी मंदीची असली तरी दिशा अजूनही तेजीची आहे. जोपर्यंत निफ्टी २५२०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निफ्टीमध्ये पुन्हा २०० ते ३०० अंकांची तेजी होऊ शकते. त्यामुळे वरील पातळ्या लक्षात ठेवून व्यवहार करणे आवश्यक आहे.
(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)
samrajyainvestments@gmail.com