Monday, November 10, 2025

मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी उद्या होणार सुनावणी, अभियंत्यांची चूक नाही असा वकिलांचा दावा!

मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी उद्या होणार सुनावणी, अभियंत्यांची चूक नाही असा वकिलांचा दावा!

ठाणे: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्यांबाबत मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार असल्याचे न्यायमूर्ती जी. टी. पवार यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे अधिकार्‍यांनी आणि रेल्वे पोलिसांनी सादर केलेले दोन्ही अहवाल तपासूनच ही सुनावणी होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकादरम्यान ९ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास लोकलमधून पडून पाच जणांचा मृत्यू तर ८ प्रवासी जखमी झाले होते. याबाबत विशाल डोळस आणि समर यादव या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा अपघात रेल्वे पोलिसांच्या चुकीमुळे झाल्याचा दावा अटकपूर्व जामिनावरील सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी केला आहे.

या अपघाताच्या पाच महिन्यानंतर व्हीजेटीआयच्या अहवालानुसार रेल्वेच्या विशाल डोळस आणि समर यादव या दोन अभियंत्यांवर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या निषेधार्थ रेल्वे युनियनने गुरुवारी केलेल्या आंदोलनामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या दोन्ही अभियंत्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. शुक्रवारी या अर्जावर ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश जी.टी. पवार यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली.

अभियंत्यांचे वकिल बलदेवसिंग राजपूत आणि प्रियांका डबले यांनी बाजू मांडताना मध्य रेल्वेचा एक अहवाल न्यायाधीशांसमोर सादर केला. त्यामध्ये गर्दीमुळे हा अपघात झाल्याचे दर्शविण्यात आले होते. तसेच, अपघाता दिवशी त्याच मार्गावरून २०० गाड्या धावल्या, जर काही बिघाड असता तर आणखी अपघात झाले असते, असा युक्तीवाद केला.

Comments
Add Comment