Monday, November 10, 2025

बीबीसीवर खोटी बातमी, महासंचालक आणि न्यूज चीफचा तडकाफडकी राजीनामा

बीबीसीवर खोटी बातमी, महासंचालक आणि न्यूज चीफचा तडकाफडकी राजीनामा

अमेरिका : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी एक भाषण केले होते. हे भाषण एडिट करुन चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. बीबीसीने आपल्या  'पॅनोरमा' कार्यक्रमात जनतेची दिशाभूल करणारी खोटी बातमी सादर केली. हा प्रकार उघड झाल्यामुळे बीबीसीचे महासंचालक टिम डेव्ही आणि न्यूज चीफ डेबोरा टर्नेस यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

बीबीसीच्या 'पॅनोरामा' कार्यक्रमामध्ये दाखवलेल्या ट्रम्प यांच्या भाषणाचे दोन वेगवेगळे भाग एकत्रितपणे संपादित करण्यात आले होते. मूळ भाषणात ट्रम्प म्हणाले होते, "आम्ही 'कॅपिटॉल'वर (अमेरिकेची संसद) मोर्चा नेऊ आणि तेथील आमच्या धाडसी सिनेटर आणि काँग्रेसला पाठिंबा देऊ." पण संपादित केलेल्या क्लिपमध्ये ते बदलून, "आम्ही कॅपिटॉलवर मोर्चा नेऊ, मी तुमच्यासोबत असेन आणि आपण लढू. असे करण्यात आले. ही संपादीत केलेली क्लिप बीबीसीने २०२४ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या माहितीपटात सादर केली. ज्यामुळे असे दिसून आले की, ट्रम्प दंगलखोरांना हल्ला करण्यासाठी चिथावणी देत ​​आहेत.

बीबीसीतील वरिष्ठ पदांचा राजीनामा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात टिम डेव्ही म्हणाले, "हा पूर्णपणे माझा वैयक्तिक निर्णय आहे. माझ्या संपूर्ण कार्यकाळात बोर्डाने मला पाठिंबा दिला आहे. बीबीसी चांगली कामगिरी करत आहे, परंतु काही चुका झाल्या आहेत आणि महासंचालक म्हणून मी याची जबाबदारी घेतली पाहिजे."

तर बीबीसी न्यूज ऑपरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डेबोरा टर्नेस यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "चुका झाल्या आहेत, पण बीबीसी न्यूजवरील संस्थात्मक पक्षपाताचे आरोप खोटे आहेत. पॅनोरामा घोटाळ्यामुळे संस्थेचे नुकसान झाले आहे, म्हणून मी राजीनामा देत आहे."

दरम्यान बीबीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी 'पॅनोरमा' आणि इतर चालू घडामोडींच्या कार्यक्रमांच्या संपादकीय पद्धतींचा आढावा घेतला जाईल. तर बीबीसीचे अध्यक्ष समीर शाह ब्रिटिश संसदेत या चुकीबद्दल माफी मागणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथसोशलवरील एका पोस्टमध्ये बीबीसीवर त्यांचे संपादित भाषण प्रसारित केल्याबद्दल तीव्र टीका केली. त्यांनी लिहिले की, "बीबीसीमधील टिम डेव्हीसह सर्व वरिष्ठ लोक राजीनामा देत आहेत किंवा त्यांना काढून टाकण्यात येत आहे. कारण ते ६ जानेवारी २०२१ च्या माझ्या भाषणाला चुकीच्या पद्धतीने सादर करताना पकडले गेले होते. या भ्रष्ट पत्रकारांना उघड केल्याबद्दल द टेलिग्राफचे आभार. हे खूप बेईमान लोक आहेत ज्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. हे लोक अशा देशाचे आहेत ज्याला आपण आपला नंबर वन मित्र मानतो. लोकशाहीसाठी ही एक भयानक घटना आहे."

Comments
Add Comment