डोंबिवली : शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाची तयारी केली आहे. दीपेश म्हात्रे यांचा भाजपमधील प्रवेश आज म्हणजे रविवार ९ नोव्हेंबर २०२५ रोजी डोंबिवली जिमखाना येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. दीपेश म्हात्रे यांच्यासोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे निवडक माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे शिउबाठाची कल्याण डोंबिवली परिसरातील राजकीय गणितं बिघडणार आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केणे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोन भाजप प्रवेशांमुळे शिउबाठा तसेच महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. ही कल्याण डोंबिवलीतील राजकारणावर मोठा परिणाम करणारी घटना आहे.
दीपेश म्हात्रे यांच्या कुटुंबाचा कल्याण डोंबिवलीच्या राजकारणावर अनेक वर्षांपासून प्रचंड प्रभाव आहे. पुंडलिक म्हात्रे हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर आणि दीपेश म्हात्रे यांचे वडील आहेत. दीपेश यांची आई आणि एक भाऊ हे पण नगरसेवक होते. दीपेश म्हात्रे हे तीन वेळा नगरसेवक आणि दोन वेळा स्थायी समिती सभापती होते.