मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका संघाचा ५२ धावांनी दणदणीत पराभव करत प्रथमच हे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात खेळाडूंचा सन्मान करण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने विश्वचषक विजेत्या संघातील राज्यातील खेळाडूंना विशेष सन्मानित करण्याची महत्त्वाची घोषणा केली होती, ज्याची पूर्तता आता करण्यात आली आहे. भारतीय महिला संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन प्रमुख खेळाडूंना राज्य सरकारने रोख रक्कम देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, स्टार फलंदाज स्मृती मानधना, अष्टपैलू खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज आणि उत्कृष्ट फिरकीपटू राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी रुपये इतके बक्षीस देण्यात आले आहे. या तिन्ही खेळाडूंनी विश्वचषक विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन दिलेला हा सन्मान राज्यातील इतर खेळाडूंसाठीही मोठा प्रेरणास्रोत ठरणार आहे.
औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी औरंगाबाद येथील एका जाहीर सभेत महाआघाडीवर (Opposition Mahagathbandhan) ...
स्मृती, जेमिमा आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटींचा चेक प्रदान
राज्यातील या तीन स्टार खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटी रुपयांची रोख रक्कम प्रदान करून गौरवण्यात आले. यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या अनुपस्थितीत खेळाडूंचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या कार्यक्रमात केवळ खेळाडूच नव्हे, तर टीम इंडियाच्या यशात मोठे योगदान देणाऱ्यांचेही कौतुक करण्यात आले. महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचाही २२.५ लाख रुपये मानधन स्वरूपात देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे, भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी आणि टीम इंडियाच्या यशात पडद्याआड राहून मदत करणाऱ्या सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. सत्कारादरम्यान या खेळाडूंनी विश्वचषकात केलेल्या कामगिरीची आठवण ताजी झाली. तिने उपांत्य फेरीत (Semi-Final) ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२७ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. संपूर्ण स्पर्धेत स्मृती ही भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. फिरकीपटू राधा यादव ही सेमीफायनल आणि फायनल अशा दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी खेळाडूंच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
'हा विजय म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा क्षण!' - उपमुख्यमंत्री अजित पवार
“भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकून देशाचं नाव जगभर उज्ज्वल केलं आहे. हा विजय फक्त क्रिकेटमधला नाही, तर प्रत्येक भारतीयासाठीच्या अभिमानाचा क्षण आहे. महिला क्रिकेट संघानं मनं आणि हृदयं दोन्ही जिंकली आहेत." महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीची तुलना त्यांनी भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयाशी केली. ते पुढे म्हणाले, "१९८३ साली श्री. कपिल देव यांनी देशाला मिळवून दिलेलं विश्वविजेतेपद आज आपल्या महिला क्रिकेटपटूंनी नव्या पर्वात नोंदवलं आहे. हा दिवस म्हणजे पुन्हा एकदा दिवाळीचा उत्सवच!” उपमुख्यमंत्री महोदयांनी या विजयाचे सामाजिक महत्त्वही अधोरेखित केले. त्यांच्या मते, या यशाचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील मुलींवर होणार आहे. त्यांनी लिहिले, “ग्रामीण भागातील अनेक मुलींना या यशानं प्रेरणा मिळेल. योग्य संधी मिळाल्यास त्या देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करू शकतात, याचा मला मनापासून अभिमान आहे.” अजित पवार यांनी शेवटी, भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.






