भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी
ऋषिश्रेष्ठ परशुरामांना खरी अंतरिक ओढ निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे अध्यात्मचिंतन करण्याची होती, पण जनताजनार्दनावर झालेल्या अत्याचाराची वार्ता कानी आल्यावर ते शांतही बसू शकत नव्हते. अन्यायाचा प्रतिकार करून ते पुनश्च तपसाधनेसाठी आपल्या आवडत्या महेंद्रगिरीवर येत. म्हणजेच परशुराम ज्ञानयोगी जसे होते तसेच ते कर्मयोगीही होते.
विकारवशतेने आलेली निष्क्रियता तसेच ज्ञानसाधनेकडे पाठ फिरविल्यामुळे आलेला मुखस्तंभपणा यांचा तीव्र निषेध करणाऱ्या आपल्या पिताश्रींबद्दल, महर्षी जगदग्मींबद्दल परशुरामांना विलक्षण आदर होता. त्यांचा कुठलाही आदेश ते तत्काळ शिरोधार्य मानत. पित्याच्या आदेशाने परशुरामांनी मातेचा वध तर केला, पण तिला पुन्हा जिवंत करण्याचे वरदान पित्याकडूनच मागून घेतले! ज्ञानतपस्वी ऋचिक ऋषींचे सुपुत्र असलेल्या महर्षी जगदग्नींची माता सत्यवती ही महर्षी विश्वामित्र ज्या गाधीराजाच्या पोटी जन्मले, त्या गाधीराजांचीच कन्या होती. तसेच परशुरामांची माता रेणुका ही सुद्धा प्रसेनजीत नावाच्या राजाची राजकन्याच होती. मातृघराण्याकडून आलेले क्षात्रतेज दोघा पितापुत्रांमध्ये होते. पण त्याचबरोबर पितृघराण्यातले धगधगीत ब्रह्मतेजही त्या दोघात होते. परशुरामांचे वर्णन आपल्या साहित्यात खालीलप्रमाणे केलेले आहे,
अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
ज्यांचे चारी वेद मुखोद्गत आहेत, ज्यांच्या पाठीवर बाणासह धनुष्य आहे, म्हणजेच ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप व अस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जे जाणतात, ते परशुरामऋषी होत. निर्बल ब्राह्मण्य व निर्बुद्ध क्षत्रियत्व हे दोन्ही त्यांना मान्य नव्हते. बल आणि सत्तेमुळे झालेल्या उन्मत्त राज्यकर्त्यांचा परशुरामांनी विनाश केला. परशुराम हे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा विनाशासाठी अवतरणाऱ्या श्रीविष्णूंचा सहावा अवतार मानले जातात. श्रीविष्णूंच्या मत्स्य, कूर्म इ. अवतारांवर जसे एकेक स्वतंत्र पुराण आहे तसे परशुराम अवतारावर पुराण नाही. मात्र त्यांच्या कथा रामायण, महाभारतात तसेच इतर पुराणात भरपूर आढळतात. श्रीविष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांकडून शिवधनुष्य भंग झाल्यावर क्रोधित झालेल्या परशुरामांनी आपल्या जवळच्या वैष्णव धनुष्यास प्रत्यंचा जोडून दाखविण्याचे अत्यंत अशक्यप्राय काम त्यांना सांगितले, श्रीरामांनी तसे करून दाखविल्यावर परशुरामांनी ते वैष्णवधनुष्य श्रीरामांना देऊन टाकले. या निमित्ताने त्यांनी आपले तेज श्रीराम यांच्यामध्ये संक्रमित केले.
त्रेता आणि द्वापार युगांच्या संधीकाली वैशाख शुद्ध तृतीयेला नर्मदा नदीकाठी परशुरामांचा जन्म झाला. स्वायंभुव मन्वंतरातील सप्तर्षींमधले मरिचीऋषी यांच्या कुलात तसेच ब्रह्मदेवाचे मानसपुत्र महर्षी भृगू यांच्या वंशात परशुराम जन्म झाला, भृगू वंशातील म्हणून परशुराम, जमदग्नी, ऋचिक यांना भार्गव असेही म्हणतात. परशुराम अतिशय तल्लख बुद्धीचे होते. त्यांनी कश्यप ऋषींकडे सर्व विद्यांचे अध्ययन केले. नंतर गंधमादन पर्वतावर तप करून शिवाला प्रसन्न केले. शिवाने त्यांना अनेक अस्त्रे दिली. त्यातच त्यांचा प्रसिद्ध परशूही दिला. परशुरामांचे मूळ नाव राम होते, पण शिवाकडून त्यांना परशू मिळाला आणि तो परशू त्यांच्या सतत जवळ असे म्हणून त्यांना परशुराम नाव पडले. परशुरामांचे वर्णन हरिवंशात पुढीलप्रमाणे केले आहे.
अंसावसक्तपरशुं जटावल्कलधारिणम् ।
गौरमग्निशिखाकारं तेजसा भास्करोपमम् ।।
क्षत्रान्तकरमक्षोभ्यं वपुष्मन्तमिवार्णवम् ।
खांद्यावर परशू घेतलेले, जटावल्कलधारी, अग्निज्वाळेसारखे तांबुस गोरे, सूर्यासारखे तेजस्वी, क्षत्रियांचे अंतक, कोणाकडूनही क्षुब्ध न होणारे, गुणांचा सागरच असे परशुराम होत. रेणुकेच्या वधाचा आदेश देणारे महर्षी जगदग्मी उत्तरायुष्यात अतिशय शांत झाले होते. त्यांना उपद्रव देणाऱ्या सहस्रार्जुनाचा वध आपला पुत्र परशुराम याने केला, हे त्यांना पसंत पडले नव्हते, कारण सहस्त्रार्जुन हा एक समर्थ राज्यकर्ता होता. परशुरामांचे मन शांत होण्यासाठी जमदग्नींनी त्यांना तपश्चर्येला पाठविले पण त्या अवधीत ध्यानावस्थेत असलेल्या महर्षी जगदग्नींचीच निर्घृण हत्या झाली. आपल्या पित्याचे छिन्नभिन्न झालेले कलेवर घेऊन परशुराम अनेक तीर्थक्षेत्रे येथे फिरले. क्षत्रियांच्या अधम कृत्याचा रक्तरंजित पुरावा त्यांनी ठिकठिकाणच्या ब्रह्मसमुदायाला व इतर लोकांना दाखवला आणि सर्वांसमोर प्रतिज्ञा केली की, या क्रूर ब्रह्मवधाबद्दल मी पृथ्वी निःक्षत्रिय करीन.
anuradha.klkrn@gmil.com