आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य
हल्ली बहुतेक सगळ्यांनाच ताणतणाव असतात. असा माणूस शोधूनही सापडणार नाही ज्याला काहीच तणाव नाही. तणाव मानसिक आणि शारीरिक स्वरूपाचा असतो. कधीकधी क्षुल्लक वाटणारा एखादा प्रसंगही व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करतो. तणावामुळे माणसाच्या मनावर आणि शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. तणावग्रस्त व्यक्तीच्या जीवनात निरूत्साह, उदासीनता येते त्यामुळे अशी व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही.
परीक्षेच्या काळात जवळ जवळ बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येतो, याची वेगवेगळी कारणे असू शकतात. अगदी परीक्षेची तयारी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही कमी-जास्त प्रमाणात ताण येतोच. परीक्षेच्या वेळी तणाव येऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नीट नियोजन करणे गरजेचे आहे. परीक्षा फक्त शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित नसते. इंटरव्ह्यू असो, स्पर्धा परीक्षा असो, प्रेझेंटेशन असो, अशावेळी सुद्धा थोड्याफार प्रमाणात ताण येतोच. त्यांना आपण आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकू की नाही याची धास्ती वाटते. इतरांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही, तर काय होईल याचा ताण त्यांना येतो. काही विद्यार्थी आपली तुलना दुसऱ्यांशी करतात. तो अमुक किती हुशार आहे. आपण त्याच्यापुढे काहीच नाही, असा विचार करून बऱ्याच विद्यार्थ्यांना तणाव येतो. आपल्याला परीक्षेत आठवेल की नाही, जो अभ्यास केला तोच येईल की नाही असा विचार करून काही विद्यार्थी आपली तब्येत बिघडवून घेतात. अशावेळी थोडं मनाला शांत करून एक दीर्घ श्वास घ्यावा त्यामुळे आलेला ताण थोडा हलका होण्यास नक्कीच मदत होते. परीक्षेत आपणही इतरांपेक्षा चांगलं करून दाखवू शकतो याची खात्री बाळगावी. जो अभ्यास केला तो जरी नीट लक्षात ठेवला तरी आपल्यातील आत्मविश्वास वाढतो. अर्थात त्यासाठी नियमित अभ्यास गरजेचा आहे.
आजचे युग स्पर्धेचे आहे. इथे कुणीही ताणतणावापासून मुक्त नाही. जीवनातील ध्येय प्राप्त करायचे असेल, तर जीवनात थोडा ताण असणेही गरजेचे आहे. त्याशिवाय आपण मेहनत कशी करणार? प्रत्येकाची तणावाची कारणे वेगवेगळी असतात. नकारात्मक विचारांना बाजूला सारून आपले ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी मनाला रोज सांगायचे की मी हे काम करू शकतो किंवा शकते. म्हणजे तणाव येणं कमी होईल. भविष्याचा विचार करणाऱ्या लोकांना जास्त ताण येतो. जे होणार आहे ते आपल्या हातात नाही. म्हणूनच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि जीवनाचा मनमुराद आनंद घ्यावा. हसण्यानेही कितीतरी ताण कमी होतो. ताण कमी करण्यासाठी आपण आपल्या आवडत्या सिरीयल्स पाहू शकतो, आवडत्या लेखकाची पुस्तके वाचणे, छंद जोपासणे, नाटक, सिनेमा पाहू शकतो. यामुळे नक्कीच ताण कमी होईल. तणाव एक नैसर्गिक भावना आहे. मनात भीती निर्माण झाली की तणाव येतो. यातून बाहेर पडण्यासाठी आपण योग्य मार्गदर्शन मिळवू शकतो. कधीकधी बऱ्याच लोकांना तणाव घालवण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. कुठलीही परीक्षा, जीवनातील संकटे कितीही मोठी असली तरी धैर्याने, योग्य मार्गदर्शन आणि आपल्या प्रयत्नाने त्यातून मार्ग नक्कीच काढू शकतो. आपले जीवन म्हणजेही परीक्षाच आहे. आपल्या जीवनात अनेक सुख दुःखे येत असतात. आपण अनेक संकटे झेलून त्यातून बाहेर पडत असतो. जीवन एकदाच मिळतं. मग उगाच तणावात जगण्यापेक्षा हसत हसत का जगू नये?