गुरू नानक देव: मानवता आणि सामाजिक समतेचे प्रवर्तक

भारतीय संत परंपरेत अनेक थोर पुरुषांनी समाजाच्या उद्धारासाठी कार्य केले, पण त्या परंपरेतील सर्वात तेजस्वी आणि मानवतेचा खरा दीपस्तंभ म्हणजे गुरू नानक देव होते. त्यांनी धर्माला पंथ, जाती, विधी यांच्यापलीकडे नेऊन तो समाजकल्याणाशी जोडला. त्यांच्या विचारसरणीत माणुसकी, समानता, सेवा, प्रेम, श्रमसन्मान आणि न्याय यांचे अद्भुत मिश्रण आहे. त्यांचे जीवन हे केवळ धार्मिक क्रांतीचे नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचे घोषणापत्र ठरले. आजच्या काळातही त्यांची शिकवण समाजाला नवा नैतिक मार्ग दाखवते. गुरू नानक देव यांचा जन्म तळवंडी या गावात झाला, ज्याला आज ननकाना साहिब (पाकिस्तान) म्हणून ओळखले जाते. त्या काळात भारतीय समाज धर्माच्या नावाखाली विभागला गेला होता. जातिभेद, अंधश्रद्धा, स्त्रीदमन, शोषण आणि असमानता यांचे सावट संपूर्ण समाजावर पसरलेले होते. धर्म हा व्यवहाराच्या केंद्रस्थानी होता, पण त्याचा वापर लोकशोषणासाठी होत होता. अशा वेळी एका बालकाने समाजाला सांगितले की ‘ना को हिंदू, ना को मुसलमान’ म्हणजेच प्रत्येक मनुष्य सर्वप्रथम एक मानव आहे. हे वचन त्या काळातील धार्मिक संकुचिततेवर प्रहार करणारे आणि समाजाला नव्या दिशेने नेणारे होते.


गुरू नानक देव यांचे बालपण शांत, करुणामय आणि चिंतनशील वातावरणात गेले. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक अन्याय, गरिबी, आणि धर्माच्या नावाखाली होणारे अत्याचार जाणवले. त्यांनी देवाला शोधण्याची प्रक्रिया बाह्य पूजापद्धतीत नव्हे, तर अंत:करणातील शुद्धतेत शोधली. त्यांनी धर्माला मनुष्याच्या आचरणाशी जोडले. त्यांच्या दृष्टीने धर्म म्हणजे सत्याचा शोध, इतरांविषयी करुणा, प्रामाणिक श्रम आणि सामूहिक कल्याणासाठीची सेवा होय. त्यांची मूलभूत शिकवण तीन शब्दांत सांगता येते ते म्हणजेच ‘नाम जपो, किरत करो आणि वंड छको’. या तत्त्वांमध्ये समाजजीवनाची संपूर्ण दिशा अंतर्भूत आहे. नाम जपो म्हणजे सतत सत्य आणि परमात्म्याचे स्मरण, म्हणजेच अंत:करणातील शुद्धता; किरत करो म्हणजे प्रामाणिक श्रम करा, म्हणजेच जीवनात परिश्रम आणि स्वावलंबनाचा सन्मान करा; तर वंड छको म्हणजे आपल्या उत्पन्नातील काही भाग इतरांसोबत वाटून घ्या, म्हणजेच समाजातील दुर्बल घटकांविषयी जबाबदारी बाळगा. या शिकवणुकीत आर्थिक समता, सामाजिक न्याय आणि नैतिकतेचा सुंदर संगम दिसतो. हे तीन तत्त्व आजच्या समाजातही तितकेच उपयुक्त आहेत.


गुरू नानक देव यांनी समाजातील जातिभेदाचा तीव्र निषेध केला. त्यांच्या काळात समाजात ‘उच्च’ आणि ‘नीच’ यांच्यातील दरी फारच खोल होती. अस्पृश्यतेने माणसामाणसात भिंती उभ्या केल्या होत्या. पण त्यांनी शिकवले की ‘सब मे जोत, जोत है सोई; तिस का चानण सब मे होई.’ म्हणजे प्रत्येक जीवामध्ये त्या एकाच देवाची ज्योत आहे. त्यामुळे कोणताही भेदभाव चुकीचा आहे. ही विचारसरणी सामाजिक समतेचे मूलतत्त्व ठरली. त्यांनी देवाच्या कृपेचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक मनुष्य प्राणी मग तो कुणीही असो परमेश्वराचा अंश आहे. त्यांच्या कार्यातील सर्वात प्रभावी आणि क्रांतिकारी कल्पना म्हणजे ‘लंगर’ होय. सामूहिक भोजनाची परंपरा, लंगरात सर्व धर्म, जाती, स्त्री-पुरुष एकत्र बसून एकसमान पद्धतीने जेवतात. लंगर हे केवळ अन्नदान नाही, तर सामाजिक समतेचे सशक्त प्रतीक आहे. या उपक्रमातून त्यांनी उच्चनीचतेची भिंत पाडली आणि सामाजिक ऐक्य निर्माण केले. आजही जगभरातील गुरुद्वारांमध्ये चालणारा लंगर हा मानवतेचा, सेवाभावाचा आणि समतेचा जिवंत वारसा आहे.


गुरू नानक देव यांनी धर्माच्या नावाखाली होणाऱ्या ढोंगीपणाला व पाखंडाला आव्हान दिले. त्या काळातील धार्मिक नेते लोकांना देवाची भीती दाखवून त्यांच्या श्रमावर जगत होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की, देवाला प्रसन्न करण्यासाठी दान, यज्ञ, हवन, आडंबराची आवश्यकता नाही; खरा धर्म म्हणजे प्रामाणिक आचरण, करुणा, आणि सत्याशी निष्ठा होय. त्यांनी धर्माचा अर्थ पुन्हा परिभाषित केला. ‘धर्म हा माणसाला माणसाशी जोडणारा बंध आहे, विभाजक नव्हे.’ त्यांनी धर्माला सामाजिक नैतिकतेचा पाया बनवला. गुरू नानक देव हे स्त्रीसमानतेचेही प्रवर्तक होते. त्या काळात स्त्रियांना समाजात कनिष्ठ स्थान होते. पण त्यांनी ठामपणे सांगितले की ‘सो क्यों मंदा आखिए, जित जमे राजान.’ म्हणजे जी स्त्री राजांना जन्म देते, ती कशी कनिष्ठ असू शकते? त्यांनी स्त्रियांना समाजातील समान स्थान देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांच्या विचारांमुळे पुढे शीख धर्मात स्त्रियांना धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मान्यता मिळाली. हे त्या काळातील समाजासाठी अत्यंत प्रगतिशील विचार होते. त्यांनी ‘सेवा’ या तत्त्वावर आधारलेली एक संस्कृती निर्माण केली. त्यांच्या मते, ‘ईश्वराची सेवा म्हणजे मनुष्य प्राण्याची सेवा होय. त्यांनी गरीब, वंचित, पीडित यांच्यासाठी कार्य करणे हेच धर्माचे खरे सार मानले. त्यांनी सांगितले की, समाजातील दुःख कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या सामर्थ्याने योगदान दिले पाहिजे. या सेवाभावातूनच शीख धर्मातील ‘सेवा’ आणि ‘संगत’ या दोन संकल्पना निर्माण झाल्या. संगत म्हणजे सामूहिक प्रार्थना आणि सहजीवनाचा भाव, तर सेवा म्हणजे निःस्वार्थपणे कार्य करणे. या दोन्ही कल्पनांनी समाजात बंधुभाव आणि सहकार्याचे वातावरण निर्माण केले.


गुरू नानक देव यांनी समाजात श्रमाचा सन्मान वाढवला. त्यांनी सांगितले की ‘घाळ खाए किछ हातहु दे, नानक राहु पछाणे से.’ म्हणजे जो स्वतः परिश्रम करतो आणि इतरांना देतो, तोच योग्य मार्ग ओळखतो. त्या काळात श्रम करणाऱ्यांना समाजात नीच मानले जात होते, पण त्यांनी सांगितले की श्रम म्हणजेच साधना. या विचारांनी श्रमिक वर्गाला आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा दिली. त्यांनी समाजाला शिकवले की परिश्रमाशिवाय अध्यात्म शक्य नाही. गुरू नानक देव यांनी आपल्या जीवनात चार प्रमुख प्रवास केले. भारताच्या विविध भागांपासून ते अरब, तिबेट, श्रीलंका, चीनपर्यंत. या प्रवासांमध्ये त्यांनी विविध धर्म, पंथ आणि संस्कृतींच्या लोकांशी संवाद साधला. त्यांनी सर्व धर्मांच्या श्रेष्ठ तत्त्वांना मान्यता दिली आणि सर्वांमध्ये एकतेचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की सत्य आणि प्रेम हाच प्रत्येक धर्माचा मूळ गाभा आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये सर्वधर्मसमभावाचे अधिष्ठान आहे. त्यांचे तत्त्वज्ञान समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर, ते ‘समावेशक समाजरचना’ निर्माण करण्याचा आराखडा होते. त्यांनी सांगितले की समाज हे धर्म, जात, लिंग या आधारांवर नव्हे, तर समानता, सहकार्य, आणि न्याय या मूल्यांवर उभे राहिले पाहिजे. त्यांनी व्यक्तीच्या आणि समाजाच्या नैतिक जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या. त्यांनी धर्म आणि समाज यांचा मेळ घालून एक सामाजिक चळवळ निर्माण केली. त्यांच्या शिकवणीत आर्थिक न्याय या संकल्पनेलाही महत्त्व आहे. त्यांनी श्रीमंत-गरीब यांच्यातील विषमता नाकारली आणि ‘वंड छको’ या तत्त्वाद्वारे संपत्तीचे समान वाटप करण्याचा संदेश दिला. त्यांनी लोभ, स्वार्थ आणि शोषणाला पाप ठरवले. त्यांच्या विचारांमध्ये सामूहिक समृद्धीची कल्पना आहे. आजच्या काळातील ‘सामाजिक समता’ आणि ‘आर्थिक न्याय’ या संकल्पना त्यांच्या शिकवणीशी पूर्णपणे सुसंगत दिसतात.


गुरू नानक देव यांची समाजदृष्टी सर्वसमावेशक, वैज्ञानिक आणि आधुनिक होती. त्यांनी शिक्षण, आत्मविकास, सत्यशोधन आणि सामाजिक जबाबदारी यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. त्यांच्या विचारांमध्ये पर्यावरणीय समतोलाचाही गाभा आहे. त्यांनी सांगितले की, ‘हवा गुरू, पाणी पिता, माता धरत महत.’ म्हणजे निसर्गातील प्रत्येक घटक आपला नातेवाईक आहे. त्यामुळे निसर्गाचा सन्मान करणे हेही धर्माचेच रूप आहे. आजच्या युगात, जेव्हा समाजात असहिष्णुता, भेदभाव, धार्मिक दुरावा आणि नैतिक अध:पतन वाढले आहे, तेव्हा गुरू नानक देव यांचे तत्त्वज्ञान अधिकच अर्थपूर्ण वाटते. त्यांनी दाखवलेला मार्ग केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक पुनर्जागरणाचा आहे. त्यांनी माणसामाणसात प्रेम आणि सहकार्याची भावना निर्माण केली. त्यांनी सांगितले की समाजाचा खरा विकास तेव्हाच शक्य आहे, जेव्हा प्रत्येक व्यक्ती इतरांसाठी जगते आणि इतरांच्या हितासाठी कार्य करते. गुरू नानक देव जयंती म्हणजे केवळ धार्मिक सण नाही, तर मानवतेच्या पुनरुज्जीवनाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की, धर्माचा सार माणसाच्या कल्याणात आहे, विधी-विधानात नव्हे. त्यांनी दिलेले ‘नाम, किरत, वंड’ हे त्रिसूत्र आजही समाजजीवनाचे दिशा-तत्त्व ठरू शकते. त्यांनी शिकवले की समाजात एकमेकांविषयी आदर, प्रेम, समानता आणि करुणा हीच खरी ईश्वरभक्ती आहे.


शेवटी असे म्हणता येईल की गुरू नानक देव हे केवळ शीख धर्माचे प्रवर्तक नव्हते, तर ते मानवतेचे जागतिक प्रवक्ते होते. त्यांनी दाखवलेला मार्ग कालातीत आहे, जो प्रत्येक माणसाला स्वतःच्या अंत:करणाशी जोडतो आणि समाजाशी नाते घट्ट करतो. त्यांचे विचार आजही समाजाच्या आत्म्याला नवी ऊर्जा देतात. त्यांच्या शिकवणुकीचा अर्थ असा की, माणूस हेच देवाचे सर्वश्रेष्ठ रूप आहे. म्हणूनच गुरू नानक देव जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या तत्त्वांचा अंगीकार करून समाजात प्रेम, समानता आणि सेवा या मूल्यांचा पुनःप्रकाश प्रज्वलित करणे होय.


- डॉ. राजेंद्र बगाटे

Comments
Add Comment

ज्येष्ठ नागरिकाचा न्यायासाठी प्रयास आणि प्रवास

जीवनात अनेकदा लहान चुका किंवा चुकीच्या नोंदीही मोठा संघर्ष निर्माण करतात. अशाच एका परिस्थितीत, ७८ वर्षीय विष्णू

सागरी महासत्तेच्या दिशेने वाटचाल...

इंडिया मेरीटाईम समिट म्हणजे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विविध सागरी परिषदांची एकत्र गुंफण होय. या

गावांचा कायापालट अन् देशाचा विकास

भारत देशातील गावांमध्ये हस्त उद्योगांचा ऱ्हास झाल्याने गावांचा विकास खुंटला. त्यामुळे रोजगाराच्या निमित्ताने

'कामगार कायदे संहिता' एक परिवर्तनकारी पाऊल

जयपूरमधील डिलिव्हरी सेवा असो. साणंदमधील तंत्रज्ञान सेवा असो अथवा गुवाहाटी येथील बांधकाम व्यवसाय असो. सर्व

नक्षलवादी आले मुख्य प्रवाहात...

वर्षानुवर्षे जंगलात फिरणारे अनेक नक्षलवादी आता मुख्य प्रवाहात परत येऊ इच्छितात आणि शांततापूर्ण जीवन जगू

'मालवणी'ला प्रतिष्ठा देणारा नाटककार

मालवणी नाटकांचा पाया रचणारे आणि या भाषेला जागतिक मंच देणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन झाले.