पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतीची निवडणूक
मुंबई : पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतीच्या निवडणूकीचे नियोजन आहे. २१ दिवसात पहिला टप्पा पूर्ण करुन तात्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुक घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन आहे. नगरपालिका आणि पंचायती समितीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची घोषणा सोमवारी किंवा मंगळवारी केली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होईल.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.
अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदतकार्यात गुंतली आहे. त्यामुळे, या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ ची मुदत दिली आहे. निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी १० दिवस आधी पार पाडल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.
आधी नगरपालिका नंतर जिल्हा परिषदेची निवडणूक
महाराष्ट्रात अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक त्यातून कुठे सावरु लागले आहेत. त्यातच काही भागात गेल्या आठ-पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर आधी जि. प. निवडणूक घ्यावी का, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संमिश्र मते व्यक्त केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यासारखी स्थिती नाही, असे मत नोंदविले. त्यामुळे नगरपालिकांची निवडणूक आधी होईल, असा अंदाज आहे.
मुंबई महापालिकेसाठी सर्वांचीच व्यूहरचना
ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूकांवर अवलंबून आहेत. शहरी भागातील समीकरणे व ग्रामीण भागातील समीकरणे पूर्णपणे स्वतंत्र आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक व अन्य ग्रामीण भागातील सुधारलेल्या शहरी कार्यक्षेत्रात महापालिका कार्यरत असल्या तरी महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये एमएमआर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या महापालिकेतील सत्ता मिळविण्यासाठी महाविकास आघाडी, महायुतीमध्ये चुरस आहे. अर्थांत जागावाटपावरुन महायुती व महाविकास आघाडीमध्ये धुसफुस निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाणे व कल्याण-डोंबिवली महापालिकेवर शिवसेनेचा पर्यांयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असल्याने या दोन महापालिका शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. पनवेल महापालिकेवर भाजपच्या रामशेठ ठाकूर यांचा प्रभाव असल्याने त्या ठिकाणी भाजप स्वबळावर लढण्यासाठी आग्रही राहील. नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप व शिवसेनेत स्थानिक पातळीवर कमालीचा संघर्ष निर्माण झाल्याने तिथे युतीची शक्यता मावळली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीत कमालीची चुरस राहील. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसचा मुंबई मनपा क्षेत्रात फारसा प्रभाव नसल्याने भाजप व शिवसेना जागावाटपात राष्ट्रवादीचा विचार करतील, असे वाटत नाही.