दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी निलेशचंद्र विजय यांचा निर्वाणीचा इशारा; लोढा-नार्वेकरांची मध्यस्थी यशस्वी
मुंबई : दादर येथील कबुतरखाना (Kabhutarkhana) आणि अन्य कबुतरखाने पुन्हा सुरू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदानात आमरण उपोषण करणारे जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मध्यस्थीनंतर आणि शासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, 'पंधरा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषण सुरू करू,' असा निर्वाणीचा इशारा मुनींनी दिला आहे.
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी कबुतरखाने सुरू करण्याच्या मागणीसाठी अन्न आणि पाण्याचा त्याग करण्याचा कठोर निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर, जैन समाजाचे प्रतिनिधी असलेले मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांनी त्यांची भेट घेतली व चर्चा केली.
या चर्चेनंतर, १५ दिवसांच्या कालावधीत या प्रकरणावर तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. या आश्वासनानंतर मुनींनी उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे.
जैन मुनींच्या प्रमुख तीन मागण्या काय आहेत?
उपोषण मागे घेताना जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी आपल्या मागण्या स्पष्ट केल्या.
कबुतरखाने सुरू करा: ५२ कबुतरखाने, विशेषत: दादर कबुतरखाना, तातडीने खुले करावेत.
जैन बोर्ड आणि संरक्षणाची मागणी: विलेपार्ले-अंधेरी येथील तोडलेले मंदिर आणि जैन बोर्डिंग पुन्हा हवे आहे. मुस्लिम बोर्डिंगसारखेच सनातन बोर्ड स्थापन करावे.
गौरक्षक हल्ले थांबावे: गौरक्षकांकडून होणारे हल्ले थांबवण्यात यावेत.
जैन मुनी म्हणाले, "मंगलप्रभात लोढा हे मंत्री आणि जैन समाजाचे प्रतिनिधी आहेत. तसेच, काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे फोनवर बोलणे झाले, पण मी असंतुष्ट होतो. आज राहुल नार्वेकर आले आणि त्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. समाजाच्या अनेक संघटना सोबत आल्याने, आम्ही १५ दिवसांची मुदत दिली आहे."
'आस्थेच्या' विषयावर तडजोड नाही
कबुतरखान्यांबाबत मुनींनी स्पष्ट केले की, पालिकेच्या आणि न्यायालयाच्या दोन तासांच्या निर्णयावर ते समाधानी नाहीत. ते म्हणाले, "आम्हाला नवे कबुतरखाने नकोत, आमचे जुनेच कबुतरखाने हवे आहेत. कबुतरे १-२ किमी उडतात. १०० किमी दूर जागा देणे हा आमच्या आस्थेचा विषय आहे."
त्यांनी पुढे म्हटले की, "जैन समुदायावर आजपर्यंत कोणताही अन्याय झाला नाही. सत्तेत योगी (योगी आदित्यनाथ) आणि मोदी (नरेंद्र मोदी) बसले आहेत. योगी धर्म वाचवत आहेत, मोदी देश वाचवत आहेत. त्यामुळे अन्याय होणार नाही. जर १५ दिवसांत मागणी पूर्ण झाली नाही, तर आम्ही पुन्हा शांतीप्रिय आंदोलन सुरू करू."
आता सरकार १५ दिवसांत या संवेदनशील विषयावर काय तोडगा काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जैन मुनी निलेशचंद्र विजय, आमरण उपोषण, दादर कबुतरखाना, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, मुंबई, कबुतरखाने, जैन समाज, Jain Muni, Mumbai News, Aazad Maidan, Kabutar khana, Maharashtra Government, Marathi News,