नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून देशाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला. यापूर्वी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाने भारतासाठी दोन एकदिवसीय विश्वचषक जिंकले आहेत. कपिल देव यांनी १९८३ मध्ये भारताला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने भारताला दुसऱ्या एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकून दिली. आता, हरमनप्रीतनेही इतिहासात आपले नाव कोरले आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ गडी गमावून २९८ धावा केल्या. २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका ४५.३ षटकांत २४६ धावांवर ऑलआउट झाली आणि भारतीय महिला क्रिकेट संघाने ५२ धावांनी सामना जिंकून विश्वचषक जिंकला.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २ एप्रिल २०११ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला. २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात धोनीने भारतासाठी विजयी षटकार मारला. भारतासाठी धोनीने ७९ चेंडूत ९१ धावा केल्या. गौतम गंभीरने ९७ धावा केल्या. श्रीलंकेसाठी महेला जयवर्धनेने १०३ धावा केल्या होत्या. दरम्यान, भारताने २८ वर्षांनंतर दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
कपिल देव यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटचा सुवर्ण इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. १९८३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघा विश्वचषक उंचावेल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. पण कपिल देव यांच्या संघाने अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताला पहिले एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले होते. त्यावेळी वेस्ट इंडिजचा पराभव करणे अशक्य मानले जात होते. पण भारताने ट्रॉफी जिंकून इतिहास रचला होता.
६० षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघ ५४.४ षटकात १८३ धावांवर ऑलआउट झाला. भारताकडून कृष्णमाचारी श्रीकांतने सर्वाधिक ३८ धावा केल्या. १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर ५२ षटकांत १४० धावांतच गारद झाला आणि भारताचा ४३ धावांनी विजय निश्चित झाला आणि पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी तीन, तर कपिल देव आणि रॉजर बिन्नी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती.
हरमनप्रीत कौरने भारतासाठी पहिली-वहिली महिला विश्वचषक ट्रॉफी उंचावत कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीच्या पंक्ती स्थान मिळवले आहे. आतापर्यंत भारतासाठी या तीन कर्णधारांनी विश्वचषकचे विजेतेपद पटकावले आहे. हरमनप्रीत कौरच्या या टीमने मिळवलेल्या सोनेरी यशाने भारतीय महिला क्रिकेटला एक नवी उमेद मिळणार आहे. ज्याप्रमाणे १९८३चा विश्वचषक भारताने जिंकल्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेटचा चेहरा बदलला होता. त्याचप्रमाणे महिलांच्या या देदिप्यमान कामगिरीमुळे निश्चितच भारतीय महिला क्रिकेट एक नवी उंची गाठेल यात शंकाच नाही.