कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मिनी बस बोगद्याच्या कडेला असलेल्या साईड बॅरिकेटला जोरात धडकली. हा अपघात झाला त्यावेळी बस वेगात होती त्यामुळे अपघातात जीवितहानी झाली. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोन भाविकांचा या अपघातात मृत्यू झाला आणि तीन भाविक गंभीर जखमी झाले. अपघातामुळे काही काळ समृद्धी महामार्गावर कर्जत बोगदा येथे कोलमडलेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली आहे.
टाटा मिनी बस समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात कडेला असलेल्या साईड बॅरिकेटला जोरात धडकली. या अपघातात मिनी बसचा चालक दत्ता ढाकवळ याचा जागीच तर प्रवासी सुरेश गौरू लाड यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सुरेखा लाड, नंदकुमार मोरे आणि राजेश विश्वनाथ लाड हे प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मिनी बसचा चालक दत्ता ढाकवळ आणि प्रवासी सुरेश गौरू लाड या दोघांचे पार्थिव नातलगांना सोपवले जाणार आहे.