नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत सात बाद २९८ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेपुढे ५० षटकांत २९९ धावा करण्याचे आव्हान ठेवले आहे.
भारताकडून स्मृती मंधानाने ४५ धावा, शफाली वर्माने ८७ धावा, जेमिमा रॉड्रिग्जने २४ धावा, हरमनप्रीत कौरने २० धावा, दीप्ती शर्माने ५८ धावा, अमनजोत कौरने १२ धावा, रिचा घोषने ३४ धावा, राधा यादवने नाबाद ३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अयाबोंगा खाकाने ३ तर नॉनकुलुलेको म्लाबा, नॅडिन डी क्लार्क आणि क्लो ट्रायॉन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऐतिहासिक महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५
यंदाच्या फायनलचा विजेता हा पहिल्यांदाच महिला क्रिकेट वर्ल्डकपवर स्वतःचे नाव कोरणार आहे. यामुळे या ऐतिहासिक सामन्याचे महत्त्व वाढले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ तिसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी २०१७ आणि २००५ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्डकप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यामुळे यावेळी तरी भारत विश्वविजेता होईल अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत. महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये लॉर्ड्स येथे अंतिम सामना झाला. हा सामना इंग्लंडने नऊ धावांनी जिंकला होता. याआधी २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर अंतिम सामना झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने ९८ धावांनी जिंकला होता. या दोन्ही सामन्यांत भारत उपविजेता झाला होता. यामुळे आता तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात खेळत असलेला भारतीय महिला क्रिकेट संघ यावेळी तरी विश्वविजेता होतो का याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.