होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी २० सामना होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. याआधी पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे बरोबरी साधण्यासाठी होबार्टमध्ये विजय मिळवणे भारतासाठी आवश्यक आहे.
होबार्टमध्ये सुरू असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने नऊ षटकांत चार बाद ७५ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड सहा धावा करुन अर्शदीप सिंगच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवकडे झेल देऊन परतला तर यष्टीरक्षक असलेला जोश इंगलिस फक्त एक धाव करुन अर्शदीप सिंगच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देऊन परतला. कर्णधार असलेला मिचेल मार्श अकरा धावा करुन वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर तिलक वर्माकडे झेल देऊन परतला. मिचेल ओवेन शून्य धावा करुन वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
भारतीय संघात तीन बदल
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्माला, हर्षित राणाच्या जागी अर्शदीप सिंगला तर कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात घेतले आहे. तर ऑस्ट्रेलिया त्यांच्या संघात जोश हेझलवूड ऐवजी शॉन अॅबॉटचा समावेश केला आहे. ग्लेन मॅक्सवेल हा सामना खेळणार होता पण तो अजून पूर्णपणे बरा झाला नसल्यामुळे त्याला हा सामना खेळता येणार नाही. दुसऱ्या सामन्यात तीन बळी घेणारा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आता मालिकेत खेळणार नाही. नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या अॅशेस मालिकेच्या तयारीसाठी तो शेवटच्या तीन सामन्यांमध्ये नसेल, असे ऑस्ट्रेलियाने जाहीर केले.
भारतीय संघ: शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाचा संघ: मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, शॉन अॅबॉट, मॅट कुह्नेमन.
पावसाची शक्यता ?
सामन्यादरम्यान खेळ थांबवण्याची शक्यता खूप कमी आहे. तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. आर्द्रता सुमारे ४५ टक्के असेल. पावसाची शक्यता फक्त दहा टक्के आहे.