मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील काही दिवसांपूर्वी जेव्हीआरएल-बीकेसी-कफ परेड या भुयारी मेट्रो ३ चे उद्घाटन करण्यात आले होते. मुंबई मेट्रो ३ हा भुयारी मार्ग असल्यामुळे प्रवास करताना नेटवर्कची अडचण येत असल्याने प्रवासी नाराज आहेत. यावर उपाय म्हणून प्रवाशांना सरकारी भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) नेटवर्क मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईतील भुयारी मेट्रो जमिनीपासून सरासरी १८ मीटर खोलवरून धावते. त्यामुळे मेट्रोमधून प्रवास करताना नेटवर्कची अडचण येणार याची कल्पना मेट्रोला होती. या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सौदी अरेबियाच्या ‘एसेस इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीशी मोबाइल नेटवर्क सुविधा उभारणीच्या कंत्राटी तत्त्वाववरील करार केला आहे. मात्र या विदेशी कंपनीच्या नेटवर्कचा मुंबईकरांना काहीच फायदा नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत.
मुंबई: राज्यात सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच हालचाली सुरू असून नेत्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच निवडणुकीच्या तारखांचे ...
एमएमआरसीएलमधील सूत्रांनुसार, रिलायन्स जिओने एसेस इन्फ्राचे जाळे वापरून त्याआधारे नेटवर्क देण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच त्यांचे नेटवर्क संपूर्ण मार्गिकेभर कुठेही नाही. एअरटेलनेही यातून काढता पाय घेतला आहे. तर ‘वि’ म्हणजेच व्होडाफोन-आयडीयाचे नेटवर्क भुयारी मेट्रो ३ च्या धारावी ते आचार्य अत्रे चौक या सहा स्थानकांपूरते मर्यादित आहे. त्यामुळे आता बीएसएनएलने नेटवर्क देण्यास मंजूरी दिली तर मेट्रो प्रवाशांना नेटवर्क मिळेल अशी आशा आहे.
या मार्गिकेची सर्व स्थानके जमिनीपासून किमान तीन मजले खाली आहेत. तर, तिकीट खिडकीसुद्धा दोन मजले खाली आहे. एकीकडे डिजिटल तिकिटांचा आग्रह धरीत असताना तिकीट काढण्यासाठी प्रवाशांसमोर दहा अॅप उपलब्ध करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे डिजिटल तिकिट काढण्यासाठी नेटवर्कचा प्रश्न भेडसावत आहे. यावर उपाय म्हणून कंपनीने तिकीट काढण्यापूरते 'मेट्रोकनेक्टर' या अॅपच्या माध्यमातून वाय-फाय सुविधा दिली आहे. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी स्टेशन परिसरात १० मीटर एवढ्या अंतरावर 'वाय-फाय' सेवा देण्यात आली आहे.






