 
                            चीन अमेरिकेचे कृषी, ऊर्जा उत्पादन खरेदी करणार; फेंटॅनाईल संकटावर मदत करण्याचे आश्वासन
ग्योंगजू (दक्षिण कोरिया): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या भेटीमुळे अमेरिका-चीनमधील 'टॅरिफ युद्ध' लवकरच शांत होण्याची चिन्हे आहेत. या भेटीत चीनने अमेरिकेकडून सोयाबीन, ज्वारी आणि इतर शेत उत्पादने खरेदी करण्यास तसेच फेंटॅनाईल संकट संपवण्यासाठी मदत करण्यास सहमती दर्शवली आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर म्हटले की, “आम्ही अनेक गोष्टींवर सहमत झालो आहोत. अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सोयाबीन, ज्वारी आणि इतर शेत उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास चीनला अधिकृत केले, याचा मला विशेष सन्मान वाटतो.”
याव्यतिरिक्त, चीनने रेअर अर्थ, क्रिटिकल मिनरल्स आणि मॅग्नेटचा प्रवाह ‘खुला आणि मुक्त’ ठेवण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच, फेंटॅनाईल संकट संपवण्यासाठी चीन अमेरिकेला पूर्ण सहकार्य करेल, असेही ट्रम्प म्हणाले. चीन अमेरिकन ऊर्जेची खरेदी प्रक्रियाही सुरू करणार आहे.
दुसरीकडे, जिनपिंग यांनी बहुपक्षीय व्यापार प्रणाली जपण्याचे आणि जागतिक आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. त्यांनी औद्योगिक आणि पुरवठा साखळ्या स्थिर ठेवण्यावर जोर दिला.

 
     
    




