नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरेल, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. राज्य सरकारशी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर आज, शुक्रवारी नागपूरला पोहचल्यावर कडू बोलत होते.
यासंदर्भात कडू म्हणाले की, जर सरकारने कालपासूनच कर्जमाफीची घोषणा केली असती, तर ती 31 मार्च 2025 पर्यंतच्या थकीत कर्जावर लागू झाली असती. मात्र आता ही कर्जमाफी 31 मार्च 2026 पर्यंतच्या थकबाकीवर लागू होईल. त्यामुळे यंदाच्या अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असे कडू यांनी सांगितले. सरकारच्या प्रतिनिधींसोबत काल सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत तीव्र चर्चा झाल्याचे कडू यांनी नमूद केले.
सरकार आर्थिक कारणे पुढे करून तारीख देण्यास तयार नव्हते. मात्र आम्ही तारीख घेऊनच आल्याचे कडू यांनी सांगितले. तसेच त्यांनी विश्वास व्यक्त केला की सर्व शेतकऱ्यांची नाही, पण गरीब आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित होईल. कर्जमाफीसाठी सरकारमधील प्रमुख नेत्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे कडू यांनी सांगितले. “एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका आणि आमचे देवा भाऊ यांचे प्रयत्न या सर्वांच्या मेहनतीमुळेच कर्जमाफी शक्य झाली. हा श्रेयाचा नव्हे, तर राजकीय आशीर्वादाचा मुद्दा आहे. अखेरीस श्रेय सरकारलाच मिळणार असल्याचे कडू यांनी सांगितले.
विरोधकांकडून सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या कर्जमाफीचा राजकीय फायदा घेईल, या आरोपांवर कडू यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. आम्ही नामर्दाची अवलाद नाही. जर सरकारने निवडणुकीचा फायदा न घेता कर्जमाफी केली नाही, तर आमच्या हातातला हिरवा रंग लाल होईल. आम्ही सरकारला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला.कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्यानंतर कडू भावुक झाले. आज माझी आई असती तर तिचा समाधानी चेहरा पाहायला मिळाला असता. यंदा निवडणुकीचा गुलाल आमच्या हातून गेला असेल, पण आमच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य रंगीत करण्याची संधी आम्हाला मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.