७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्यास होकार दिला आहे. त्यानुसार आज संध्याकाळी ७ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर (Sahyadri State Guest House) आंदोलकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही उपस्थित असतील. आंदोलकांकडून बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि अजित नवले हे नेते सरकारसोबत वाटाघाटी (Negotiations) करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या उच्चस्तरीय बैठकीला मुख्य सचिवांसह विविध विभागांतील ३० हून अधिक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आजच्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाचा आणि अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. बैठकीत बच्चू कडू यांनी दिलेले निवेदन आणि ७ एप्रिल रोजी झालेल्या मागील बैठकीतील निर्णयांवरील कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल.
अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल दिसून येत आहे. 'मोंथा' (Montha) ...
'आज तोडगा निघाला नाही तर...बच्चू कडूनच थेट इशारा
नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला रवाना होण्यापूर्वी मोठे विधान केले आहे. सर्व शेतकरी नेते एकत्र आले आहेत, हेच या आंदोलनाचे सर्वात मोठे यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या एकजुटीमुळे शेतकऱ्यांना बळ मिळते आणि ते आत्महत्येचा विचार करत नाहीत, असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले. आज संध्याकाळी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत प्रामुख्याने सरसकट कर्जमाफी, पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंद्रे, २० टक्के बोनस आणि हमीभाव (MSP) या मागण्यांवर सरकारसोबत चर्चा होईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. सरकारने आजच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही, तर मुंबईवरून नागपूरला परत आल्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असा स्पष्ट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
'बच्चू कडू शेतकऱ्यांच्या लढ्यासाठीच जन्माला आले!'; भावाची भावनिक प्रतिक्रिया
दरम्यान, बच्चू कडू यांचे मोठे बंधू बाळू बाबाजीराव कडू यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. बाळू कडू म्हणाले, "आमचा लहान भाऊ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला जात आहे. त्याने शेतकरी हिताचा आणि कर्जमुक्तीचा निर्णय घेऊनच परत यावे, अशी आमची अपेक्षा आहे." त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या आईने पूर्वीच बच्चू कडू यांचा शेतकरी हितासाठीचा लढा पाहून, त्याने आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी द्यावे, असे सांगितले होते. बाळू कडू यांनी पुढे सांगितले की, "आम्हीही कधीही बच्चू कडू यांना कौटुंबिक जबाबदारीत अडकवत नाही. उलट, आमच्या कुटुंबानेच बच्चू कडू यांना एका प्रकारे शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी देऊन टाकले आहे." या प्रतिक्रियेतून बच्चू कडू यांच्या आंदोलनामागे त्यांच्या कुटुंबाचा खंबीर पाठिंबा असल्याचे दिसून येते.





