हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा
मुंबई : नेस्को गोरेगाव येथे सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक मध्ये आज राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.
महाराष्ट्र सागरी मंडळाचे हे करार इचंडिया आणि नॉलेज मरीन या कंपन्यांसोबत करण्यात आले आहे. यामुळे हरित टगबोटी साठी बॅटरी निर्मिती आणि जहाज बांधणी व दुरुस्ती बंदर उभारणी या प्रकल्पांचा समावेश आहे.
यावेळी मंत्री राणे यांनी ग्रीन जहाज बांधणी आणि बंदर उभारणी याविषयी डेन्मार्क येथील कंपन्यांच्या प्रतिनिधीं सोबत सविस्तर चर्चा केली. तसेच करंजा, दिघी या बंदरांच्या विकासाविषयीही गुंतवणुकीस उत्सुक असलेल्या कंपन्यांसोबत चर्चा करण्यात आली.
यावेळी बंदर विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप, मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खारा यांच्यासह संबंधित अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, इंडिया मेरीटाईम वीक २०२५ या कार्यक्रमातील “Maritime Excellence Achievers 2025 – Exhibition Awards” या विशेष सत्रामध्ये महाराष्ट्र राज्याला “Showcase Diversity and Impact” या कॅटेगिरीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ही गौरवपूर्ण कामगिरी महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र शासनाला “इंडिया मेरीटाईम वीक” मध्ये मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. राज्य शासनाने सागरी क्षेत्रात केलेले विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि प्रभावी सादरीकरण याची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे.