नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये लढत होणार आहे. हा दुसरा उपांत्य सामना 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचे मोठे संकट आहे.
हवामानाचा अंदाज
हवामान विभागाने 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत पावसाची 80 टक्क्यांपर्यंत शक्यता वर्तवली आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे, पण याच वेळेत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे क्रिकेट चाहते आणि दोन्ही संघांचे व्यवस्थापन चिंतेत आहे. चांगली गोष्ट म्हणजे, आयसीसीने विश्वचषकाच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवला आहे.
जर 30 ऑक्टोबर रोजी पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे किमान 20-20 षटकांचा सामना (निकाल लागण्यासाठी आवश्यक) पूर्ण होऊ शकला नाही, तर सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी हलवला जाईल. राखीव दिवशी सामना जिथे थांबला होता, तिथूनच तो पुन्हा सुरू होईल.
सामना पूर्णपणे रद्द झाल्यास काय?
समजा, 30 आणि 31 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी पाऊस पडला आणि सामना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होऊ शकला नाही (म्हणजेच दोन्ही दिवशी 20-20 षटकांचा खेळ होऊ शकला नाही), तर आयसीसीचा नियम लागू होईल. आयसीसीच्या नियमानुसार, साखळी (लीग) टप्प्यातील गुणतालिकेमध्ये (Points Table) वरच्या स्थानावर असलेल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.
साखळी टप्प्यात, ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर होता, तर भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर होता. जर पाऊस दोन्ही दिवस थांबला नाही आणि सामना पूर्णपणे रद्द झाला, तर ऑस्ट्रेलियाचा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर भारतीय संघाचे आव्हान तिथेच संपुष्टात येईल. त्यामुळे, भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा उपांत्य सामना जिंकावाच लागेल.