हरियाणा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Droupadi Murmu ) यांनी बुधवारी हरियाणातील अंबाला हवाई दल स्थानकावर राफेल (Rafale) लढाऊ विमानात यशस्वी उड्डाण करून एक नवा इतिहास रचला आहे. राफेलमधून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर (Supreme Commander) असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेलमधून केलेल्या या उड्डाणाकडे अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. राफेल लढाऊ विमानांचा वापर 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये करण्यात आला होता. २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने हे लक्ष्यित (Targeted) ऑपरेशन केले होते, ज्यात राफेल विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
राफेलमधून उड्डाण करण्याची ही राष्ट्रपती मुर्मू यांची लढाऊ विमानातली दुसरी वेळ आहे. यापूर्वी, ८ एप्रिल २०२३ रोजी त्यांनी आसाममधील तेजपूर हवाई दल स्थानकावर सुखोई-३० MKI (Sukhoi-30 MKI) लढाऊ विमानात उड्डाण केले होते. सुखोई-३० MKI मध्ये उड्डाण करणाऱ्या त्या तिसऱ्या राष्ट्रपती आणि लढाऊ विमानात प्रवास करणाऱ्या दुसऱ्या महिला राष्ट्रप्रमुख होत्या.
माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ८ जून २००६ रोजी, तर प्रतिभा पाटील यांनी २५ नोव्हेंबर २००९ रोजी लोहगाव येथील हवाई दल स्थानकावर सुखोई-३० MKI विमानातून यशस्वी उड्डाण केले होते. राफेल लढाऊ विमाने फ्रान्सची एरोस्पेस कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने (Dassault Aviation) तयार केली आहेत. ही विमाने २७ जुलै २०२० रोजी फ्रान्समधून भारतात दाखल झाली आणि सप्टेंबर २०२० मध्ये अंबाला हवाई दल स्थानकावर भारतीय हवाई दलात औपचारिकरित्या समाविष्ट (Induction) करण्यात आली.