प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार
मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास अखंडित आणि सिग्नल-फ्री होणार आहे. यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वसई विरारकरांपासून डहाणूच्या लोकांना रोज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर दुसऱ्या बाजूला लोकप्रवाशी जीवघेणा ठरत आहे, यावर उपाय म्हणून आता विरार ते मारिन ड्राईव्ह असा मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गा मुळे विरारकरांना दिलासा मिळणार असून विरार ते वर्सोवा हे अंतर अवघ्या ४५ मिनिटात पूर्ण करता येणार आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे आणि दळणवळणामुळे मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, विशेषतः घोडबंदर येथील वाहतूक समस्या, यावर हा सागरी पूल प्रकल्प कायमस्वरूपी तोडगा ठरणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत हा प्रकल्प साकारला जात आहे.
विरार कनेक्टर १८.९५ कि.मी थेट दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेशी (वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग) जोडला जाईल. हा सी लिंक पूर्ण झाल्यानंतर, दहिसर-भाईंदर कोस्टल रोड आणि वर्सोवा कोस्टल रोडच्या माध्यमातून, थेट मरीन ड्राइव्ह (दक्षिण मुंबई) पासून प्रवास सुरू करून विरारपर्यंत अखंडित आणि सिग्नल-मुक्त प्रवास करणे शक्य होणार आहे. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वे आणि लोकल ट्रेनवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. सध्या वर्सोवा ते विरार हे अंतर पार करण्यासाठी जवळपास दोन तासांचा वेळ लागतो, जो या प्रकल्पामुळे केवळ ४५ मिनिटांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- मुख्य सागरी पूल २४.३५ कि.मी. उत्तन ते विरार दरम्यान समुद्रावरून जाणारा मुख्य मार्ग.
- एकूण कनेक्टर्स ३०.७७ कि.मी. प्रकल्पाला मुख्य रस्त्यांशी जोडणारे मार्ग.
- उत्तन कनेक्टर ९.३२ कि.मी. वर्सोवा-भायंदर-दहिसर कोस्टल रोडशी जोडला जाईल.
- वसई कनेक्टर २.५० कि.मी. पूर्णपणे उन्नत मार्ग.