देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. याचे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या व्यापार धोरणांवर आणि आंतरराष्ट्रीय धोरणांवर सातत्याने टीका करत आहेत. एवढेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जवळपास ५० टक्के आयात शुल्क लादले आहे. त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. यातच भारताने रशियाकडून तेल आयात करू नये म्हणून ट्रम्प सातत्याने टीका करत आहेत. मात्र, अमेरिकेच्या या दबावाला भारत जुमानत नाही, असे एक उदाहरण भारताने समोर ठेवले आहे.
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारताने रशियाबरोबर विमान निर्मितीच्या क्षेत्रातील ऐतिहासिक करार केला असून, आता देशात सुखोई सुपरजेट तयार होणार आहे. भारताने पहिल्यांदाच संपूर्ण प्रवासी विमानाचे उत्पादन करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्यातील करारानुसार, सुखोई सुपरजेट एसजे-१०० या नागरी विमानाच्या निर्मितीसाठी रशियाच्या मॉस्कोमध्ये मंगळवारी स्वाक्षरी करण्यात आली.
उद्योगाच्या अंदाजानुसार पुढील दशकात भारताला प्रादेशिक मागणी पूर्ण करण्यासाठी या श्रेणीतील २०० पेक्षा जास्त जेट्सची आवश्यकता असेल. तसेच हिंद महासागर क्षेत्रातील जवळच्या आंतरराष्ट्रीय स्थळांना सेवा देण्यासाठी आणखी ३५० विमानांची आवश्यकता असेल, त्यामुळे हा करार भारतासाठी एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे देशात मोठ्या प्रमाणावर थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. विमान निर्मितीशी संबंधित स्पेअर पार्ट्स, देखभाल, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळीमध्ये हजारो संधी निर्माण होतील. HAL साठी हा एक तांत्रिक टप्पा ठरेल, जो भारताला नागरी विमाननिर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळवून देईल.
भारत-रशिया नात्यांत नवा अध्याय
संरक्षण क्षेत्रात आधीच मजबूत भागीदारी असलेल्या भारत आणि रशियामधील हा करार आता नागरी विमानन क्षेत्रालाही नवी दिशा देईल. HAL आणि UAC यांच्यातील हे सहकार्य भारतात पूर्णपणे प्रवासी विमान निर्मितीचा पहिला प्रयत्न ठरणार आहे. याआधी HAL ने १९६१ साली AVRO HS-७४८ चे उत्पादन केले होते, जे १९८८मध्ये थांबवण्यात आले. आता SJ-१०० निर्मितीमुळे भारतीय विमाननिर्मिती उद्योगाच्या इतिहासात नव्या अध्यायाची सुरुवात झाली.