नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल तळावर भेट देणार आहेत. ही भेट अत्यंत विशेष ठरणार आहे, कारण त्या भारतातील सर्वात अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानात उड्डाण करणार आहेत. राष्ट्रपतींच्या या ऐतिहासिक उड्डाणाकडे भारतीय हवाई दलासाठी अभिमानाचा क्षण आणि देशातील महिलांसाठी प्रेरणादायी पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
दुसऱ्यांदा लढाऊ विमान उडवणार राष्ट्रपती
यापूर्वी, ८ एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रपती मुर्मू यांनी आसाममधील तेजपूर हवाई तळावरून सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानात उड्डाण केले होते. त्या वेळी त्यांनी भारताच्या लष्करी सामर्थ्याचे कौतुक करताना सांगितले होते की, “हे उड्डाण केवळ रोमांचक नाही, तर आपल्या देशाच्या तांत्रिक प्रगतीचे प्रतीक आहे.” जवळपास दोन वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा लढाऊ विमानात उड्डाण करणार असून, या वेळी त्या राफेलमध्ये असतील, जे भारताच्या संरक्षण क्षमतेचे सर्वोत्तम प्रतीक मानले जाते.
अंबाला हवाई तळावर या ऐतिहासिक क्षणासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. हवाई दलाचे अधिकारी आणि तांत्रिक पथकांनी राफेल विमानाची सर्व प्राथमिक तपासणी केली आहे. संपूर्ण एअरबेसला सजवण्यात आले असून, राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रपती हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी, वैमानिक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
राफेल हे फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीने बनवलेले अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. २०२० साली ते भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील झाले. हे विमान हवेत, जमिनीवर आणि समुद्रातही शत्रूवर अचूक प्रहार करू शकते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने राफेलचा प्रभावी वापर केला होता, जो दहशतवादाविरुद्ध भारताचा निर्णायक प्रतिसाद ठरला होता.
राष्ट्रपती मुर्मू राफेलसारखे अत्याधुनिक विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला राष्ट्रपती ठरणार आहेत. त्यांच्या या कृतीमुळे महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू होईल, तसेच भारतीय हवाई दलाचा आत्मविश्वासही दुणावेल.
राष्ट्रपती सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, या उड्डाणाचा उद्देश म्हणजे हवाई दलाच्या नवीन पिढीतील विमानांच्या क्षमतेबाबत आणि त्यांच्या तांत्रिक कौशल्याबाबत राष्ट्रपतींना प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे.